पुढारी ऑनलाईन डेस्क : Jasprit Bumrah : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने सिडनी येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत भारतीय क्रिकेट संघाचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह यजमान संघाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 वर 3-1 ने कब्जा केला. जसप्रीत बुमराहने या मालिकेत अविश्वसनीय कामगिरी केली, ज्यासाठी त्याला 'प्लेअर ऑफ द सीरीज' निवडण्यात आले. बुमराहची कामगिरी आणि त्याने केलेल्या विक्रमांवर एक नजर टाकूया.
बुमराहने 5 कसोटी सामन्यांच्या 9 डावात 13.06 च्या सरासरीने सर्वाधिक 32 बळी घेतल्या. त्याने 3 वेळा डावात 5 विकेट घेतल्या. दुखापतीमुळे तो सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करू शकला नाही. बुमराहनंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सचा क्रमांक लागतो. त्याने 10 डावात 21.36 च्या सरासरीने 25 विकेट घेतल्या. स्कॉट बोलंडने 21 आणि मोहम्मद सिराजने 18 विकेट घेतल्या.
बुमराह परदेशी भूमीवर कसोटी मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला. त्याने बिशनसिंग बेदी यांचा विक्रम मोडला. बेदी यांनी 1977-78 च्या ऑस्ट्रेलिया मालिकेत 5 सामन्यात 23.87 च्या सरासरीने 31 विकेट घेतल्या होत्या. भागवत चंद्रशेखर तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 1977-78 मालिकेत त्याने 5 कसोटी सामन्यात 25.14 च्या सरासरीने 28 विकेट्स घेतल्या होत्या. सुभाष गुप्ते यांनी 1953-54 च्या वेस्ट इंडिज दौऱ्यात 27 विकेट घेतल्या होत्या.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या एकाच मालिकेत बुमराह संयुक्तरित्या सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याने हरभजन सिंगची बरोबरी केली आहे. हरभजनने 2000-01 च्या मालिकेत 3 कसोटी खेळताना 17.03 च्या सरासरीने 32 विकेट घेतल्या होत्या. त्याने 17.03 च्या सरासरीने गोलंदाजी केली आणि 4 वेळा एका डावात 5 बळी घेतल्या होत्या. या यादीत रविचंद्रन अश्विन 29 विकेट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे.
ऑस्ट्रेलियन भूमीवर एकाच कसोटी मालिकेत 3 किंवा त्यापेक्षा जास्त 5 हॉल विकेट घेणारा बुमराह हा चौथा भारतीय गोलंदाज ठरला. त्याने मालिकेतील पहिल्या पर्थ कसोटीत एकूण 8 विकेट्स (5/30 आणि 3/42) घेतल्या आणि भारतीय संघाला विजयाकडे नेले. यानंतर, त्याने ब्रिस्बेन कसोटीत एकूण 9 विकेट्स (6/76 आणि 3/18) घेतल्या. मेलबर्न कसोटीतही त्याने 9 यश (4/99 आणि 5/57) घेतले.
या मालिकेदरम्यान बुमराह SENA देशांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनला. त्याने SENA देशांमध्ये 31 कसोटी खेळल्या आहेत. ज्यात त्याने 21.02 च्या सरासरीने 145 बळी घेतले. बुमराहने अनिल कुंबळे यांचा विक्रम मोडला फिरकी गोलंदाज कुंबळे यांनी SENA देशांमध्ये 35 सामन्यांच्या 67 डावांमध्ये 37.04 च्या सरासरीने 141 बळी घेतले आहेत. यादरम्यान त्यांनी 5 वेळा एका डावात 5 विकेट्स घेण्याची किमया केली होती.