स्पोर्ट्स

IND vs AUS 3rd Test : कसोटी चॅम्पियनशिप फायनल एका पावलावर

Arun Patil

इंदूर, वृत्तसंस्था : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेतील तिसरा सामना आजपासून इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. 4 सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारताने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारत आता ही मालिका हरणार नाही, हे निश्चित. गतविजेता म्हणून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी भारताकडेच राहणार आहे. पहिल्या दोन कसोटींतील लाजिरवाणे पराभव विसरून ऑस्ट्रेलिया या कसोटीत कमबॅक करण्यास सज्ज आहे; तर दुसरीकडे लंडनमध्ये होणार्‍या कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळण्यासाठी भारताला मालिकेतील दोनपैकी एक सामना जिंकणे अनिवार्य आहे. त्यामुळे भारतीय संघ इंदूरमधूनच आपले लंडनचे तिकीट फिक्स करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

दोन्ही देशांदरम्यान नागपूरमध्ये झालेला पहिला सामना भारताने एक डाव आणि 132 धावांनी जिंकला होता, तर दिल्लीत झालेल्या दुसर्‍या कसोटीत भारताने 6 विकेटस्नी विजय मिळवला. दोन सामन्यांनंतर दोन्ही संघांना जवळपास दहा दिवसांची विश्रांती मिळाली आहे. यादरम्यान पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघात मोठे बदलही झाले आहेत. कर्णधार पॅट कमिन्स वैयक्तिक कारणास्तव, तर डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅश्टेेन अ‍ॅगर हे खेळाडू दुखापतीमुळे मायदेशी परतले आहेत. जखमी झालेला कॅमेरून ग्रीन आता फिट होऊन संघात परतण्यास सज्ज झाला आहे. पॅट कमिन्सच्या जागी स्टिव्ह स्मिथ संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे.

पहिल्या दोन कसोटींत भारतीय फिरकीपुढे ऑस्ट्रेलियन्स अगदी हतबल झालेले पहायला मिळाले. 40 पैकी 32 विकेटस् फिरकी गोलंदाजांनी लाटल्या. यातील 21 विकेटस् या पायचित किंवा क्लीन बोल्ड झाल्या होत्या. भारतीय फिरकीला एक तर बॅकफूटवर खेळणे किंवा स्विप खेळणे हे दोनच तंत्र कांगारूंनीस्वीकारल्याचे दिसत होते. या फिरकीवर तोड काढण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ मॅथ्यू हेडनला शरण गेला आहे. त्याने संघासाठी दिलेल्या टिप्स कितपत उपयोगी पडतात, हे पाहावे लागेल.

दुसरीकडे, भारतीय संघातून के. एल. राहुल खेळणार की शुभमग गिलला संधी मिळणार, याचे उत्तर कर्णधाराने गुपितच ठेवले आहे. ते नाणेफेकीवेळीच कळेल. सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत रोहितने राहुलची पाठराखण केली होती. गिल आणि राहुल या दोघांच्या तयारीबद्दल विचारले असता, कर्णधार म्हणाला, 'जिथपर्यंत गिल आणि राहुलचा संबंध आहे, ते कोणत्याही सामन्यापूर्वी अशाप्रकारे ट्रेनिंग करण्यास प्राधान्य देतात. आज संपूर्ण संघासाठी एक वैकल्पिक सराव सत्र होते. ज्याला यात भाग घ्यायचा होता त्याने घेतला. प्लेईंग इलेव्हनबाबतचा निर्णय टॉसदरम्यान जाहीर केला जाईल,' असेही त्याने स्पष्ट केले.

रोहित आणि गिल यांनी मंगळवारी सराव सत्रादरम्यान एकत्र नेटमध्ये फलंदाजी केली, तर राहुलने संघातील बहुतांश सदस्यांसह हॉटेलमध्येच थांबण्याचा निर्णय घेतला. सोमवारी सराव सत्रादरम्यान गिल आणि राहुल या दोघांनी एकत्र फलंदाजी केली. 47 कसोटींनंतर राहुलची सरासरी 33.4 आहे, तर गिल मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सनसनाटी हंगामानंतर रेड बॉल क्रिकेटमध्ये संधीची वाट पाहत आहे. शेवटच्या 10 कसोटी डावांमध्ये 25 धावांचा टप्पा ओलांडण्यात अपयशी ठरलेल्या राहुलला दिल्लीतील दुसर्‍या कसोटीनंतर उपकर्णधारपदावरून वगळण्यात आले, त्यामुळे उर्वरित दोन सामन्यांमध्ये बदलाची आशा निर्माण झाली आहे.

संघ यातून निवडणार

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एस. भरत (विकेटकिपर), ईशान किशन (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

ऑस्ट्रेलिया : स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), स्कॉट बॉलंड, अ‍ॅलेक्स कैरी (विकेटकिपर) कॅमेरून ग्रीन, पीटर हँडस्कोम्ब, ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, मॅथ्यू कुहमॅन.

तिसरा कसोटी सामना (IND vs AUS)

स्थळ : होळकर स्टेडियम, इंदूर
वेळ : सकाळी 9.30 वा. पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस् नेटवर्क, लाईव्ह स्ट्रिमिंग : डिज्नी हॉटस्टार

SCROLL FOR NEXT