स्पोर्ट्स

IND vs AFG Test Update : मानव-कृष्णाने अफगाणिस्तानचे कंबरडे मोडले, मुल्लानपूर कसोटीत भारताचे वर्चस्व

India vs Afghanistan : भारताचा अफगाणिस्तानवर प्रहार

रणजित गायकवाड

मुल्लानपूर : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळल्या जात असलेल्या एकमेव कसोटी सामन्यावर यजमान भारतीय संघाने दुसऱ्या दिवशीही आपले पूर्ण वर्चस्व राखले. भारताच्या फलंदाजांनी उभारलेल्या ५६४ धावांच्या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत अफगाणिस्तानने ३९.५ षटकांत ५ बाद ११३ धावा केल्या आहेत. पाहुणा संघ अद्याप भारताच्या पहिल्या डावाच्या धावसंख्येपेक्षा ४५१ धावांनी पाठीमागे असून, भारतीय गोलंदाजांनी त्यांच्या अव्वल फळीला स्वस्तात तंबूत धाडून सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे.

अफगाणिस्तानच्या डावाला भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीलाच खिंडार पाडले. पदार्पणातच चमकलेल्या फिरकीपटू मानव सुथारने अप्रतिम गोलंदाजी करत केवळ २१ धावांत ३ बळी घेतले. त्याने अब्दुल मलिक (१६), रहमानुल्लाह गुरबाज (१२) आणि अफसर जजई (३) यांना बाद करत अफगाणिस्तानची कंबर तोडली. तर वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने सेदिकुल्लाह अटल (१७) आणि कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी (२०) यांना बाद करून २ गडी बाद केले. सध्या रहमत शाह ८१ चेंडूंत ४३ धावा करून खेळपट्टीवर टिकून असून, पाहुण्यांचा संघर्ष सुरू आहे. तिसऱ्या दिवशी अफगाणिस्तानचा उर्वरित डाव लवकरात लवकर गुंडाळून मोठी आघाडी घेण्याच्या निर्धाराने भारतीय संघ मैदानात उतरेल.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात चांगली झाली. यशस्वी जैस्वाल २४ धावांवर बाद झाल्यानंतर, के. एल. राहुल आणि साई सुदर्शन यांनी दुसऱ्या विकेटसाठी १३९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. सुदर्शनने १०४ चेंडूंत ८१ धावा केल्या, तर राहुलने १६५ चेंडूंत ११ व्या कसोटी शतकाची नोंद करत १०० धावांची खेळी केली. त्यानंतर कर्णधार शुभमन गिल आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यांनी डावाची सूत्रे हाती घेतली.

या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १६९ धावांची विक्रमी भागीदारी रचली. गिलने १५ चौकार आणि १ षटकारासह १२६ धावा केल्या, तर पंतने आक्रमक फलंदाजी करत ८१ धावा ठोकल्या. खालच्या फळीत वॉशिंग्टन सुंदरने नाबाद ५२ धावांचे योगदान दिल्याने भारताने ८ बाद ५६४ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. अफगाणिस्तानतर्फे मोहम्मद सलीम सैफीने १४० धावांत ६ बळी घेत चमकदार कामगिरी केली.

भारताने या डावात अनेक महत्त्वाचे विक्रम प्रस्थापित केले. २०१३ नंतर मायदेशात ५५० हून अधिक धावा करण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. तसेच, गिल आणि पंत यांच्यातील १६९ धावांची भागीदारी ही अफगाणिस्तानविरुद्ध कसोटीतील भारताची कोणत्याही विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी ठरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT