स्पोर्ट्स

IND vs AFG T20 : अफगाणिस्तानविरुद्धच्या T20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! संजूचे पुनरागमन, हार्दिक बाहेर; श्रेयस अय्यर कॅप्टन

Team India Squad Announced : बुमराहसह ४ अनफिट खेळाडूंचा संघात समावेश

रणजित गायकवाड

मुंबई : नवी दिल्ली येथे होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची मंगळवारी (१ सप्टेंबर) घोषणा करण्यात आली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील या संघात संजू सॅमसनचे पुनरागमन झाले असून, हार्दिक पांड्याला वगळण्यात आले आहे; त्याच्या तंदुरुस्तीबाबत (फिटनेस) अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. निवडलेल्या संघात जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर या ४ खेळाडूंचा सहभाग त्यांच्या फिटनेस चाचणीतील पात्रतेवरच अवलंबून असणार आहे.

संजू सॅमसनला आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यातून वगळण्यात आले होते. त्याच्या जागी संधी मिळालेला प्रभसिमरन सिंग आता संघातून बाहेर पडला आहे. याशिवाय झिम्बाब्वे दौऱ्यावर असलेला रिंकू सिंहही संघात स्थान मिळवू शकलेला नाही. खराब फॉर्म असूनही अक्षर पटेलने आपले स्थान कायम राखले आहे, तर दुखापतीतून सावरल्यानंतर वरुण चक्रवर्तीचे संघात पुनरागमन झाले आहे.

अभिषेक शर्मावर कामगिरीचे दडपण

संजूच्या पुनरागमनामुळे आणि वैभव सूर्यवंशीच्या उपस्थितीमुळे सलामीच्या जागेसाठी चुरस अधिक तीव्र झाली असून, अभिषेक शर्मावर चमकदार कामगिरी करण्याचे दडपण असेल; झिम्बाब्वेचा दौरा त्याच्यासाठी फारसा प्रभावी ठरला नव्हता. याशिवाय मधल्या फळीत सातत्यासाठी संघर्ष करणाऱ्या तिलक वर्मासमोरही स्वतःला सिद्ध करण्याचे आव्हान असेल.

रिंकू आणि प्रिन्सला मिळू शकते संधी

नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर पूर्णपणे तंदुरुस्त न झाल्यास रिंकू सिंहला संघात परत बोलावले जाऊ शकते. तसेच हर्षित राणा किंवा जसप्रीत बुमराह उपलब्ध नसल्यास प्रिन्स यादव किंवा गुरनूर ब्रार यांसारख्या खेळाडूंचा विचार होऊ शकतो. १३ ते १७ सप्टेंबर दरम्यान दिल्लीत होणाऱ्या या मालिकेसाठी निवडलेला हाच संघ या महिन्याच्या अखेरीस जपानमधील आयची-नागोया येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करेल.

सलामीच्या जागेसाठी चुरस

झिम्बाब्वे दौऱ्यातून संजू सॅमसनला वगळल्यानंतर बीसीसीआयवर बरीच टीका झाली होती. आता त्याच्या पुनरागमनामुळे संघात अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी आणि संजू सॅमसन असे तीन सलामीवीर उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे अंतिम अकरा खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्यासाठी सलामीवीरांमध्ये चुरस पाहायला मिळेल.

भारतीय संघ :

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT