लखनौ; वृत्तसंस्था : के. एल. राहुलच्या 74 धावांच्या खेळीमुळे भारत ‘अ’ संघाने 412 धावांचा पाठलाग करताना 2 बाद 169 धावांपर्यंत मजल मारली. तिसर्या दिवसाच्या शेवटच्या दोन सत्रांत भारताने प्रतिषटक 4 धावांच्या सरासरीने धावा वसूल करत या सामन्यात आपले आव्हान कायम राखले.
दिवसभरात शेवटच्या तासाभराचा खेळ बाकी असताना के. एल. राहुलला दुखापतीमुळे निवृत्त व्हावे लागले. यामुळे देवदत्त पडिक्कल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी त्याची निवड झाली आहे; पण त्याला येथे टॉड मर्फीच्या गोलंदाजीवर केवळ 5 धावांवर बाद होत परतावे लागले. यापूर्वी मर्फीने एन. जगदीशनलाही (36) बाद करत 85 धावांची सलामीची भागीदारी मोडली होती. साई सुदर्शन दुसर्या डावातही अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करत असून, तो दिवसअखेर 44 धावांवर नाबाद राहिला. नाईटवॉचमन मानव सुतार 8 चेंडूंत एका धावेवर नाबाद राहिला.
ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने 3 बाद 16 या धावसंख्येवरून डावाला पुढे सुरुवात केली. मात्र, लवकरच त्यांना आणखी एक धक्का सोसावा लागला. मागील दिवसाच्या खेळात नाबाद राहिलेल्या ऑस्ट्रेलिया ‘अ’ चा कर्णधार नॅथन मॅकस्विनीने जोश फिलिपसोबत 90 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. फिलिपने 48 चेंडूंत 50 धावा केल्यानंतर सुतारने त्याला बाद केले.
पहिल्या डावात 74 धावा करणार्या मॅकस्विनीला खालच्या फळीकडून फारशी साथ मिळाली नाही. सुतारने तीन विकेटस् घेत सामन्यात 157 धावांत 8 बळी नोंदवले. यात त्याने फिलिप आणि टॉड मर्फी (12) यांना बाद केले, तर दुसर्या दिवसाच्या अंतिम षटकात त्याने ऑलिव्हर पीकला बाद केले होते. गुरनूर ब्रारने जॅक एडवर्ड्स (10) आणि विल सदरलँड (0) यांना बाद करत डावात तीन बळी घेतले, तर मोहम्मद सिराज आणि कनक्शन सब्सटीट्यूट यश ठाकूर यांनी प्रत्येकी दोन विकेटस् घेतल्या.
यजमानांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलिया ‘अ’ चा डाव 185 धावांवर रोखला गेला आणि भारत ‘अ’ च्या चांगल्या सुरुवातीमुळे लक्ष्याचा पाठलाग करण्याच्या त्यांच्या आशा उंचावल्या आहेत. या सामन्याच्या शेवटच्या दिवशी त्यांना विजयासाठी 243 धावा करायच्या असून, आठ विकेटस् शिल्लक आहेत.