चॅम्‍पियन्‍स ट्रॉफीमध्‍ये भारतीय क्रिकेट संघाकडून झालेला पराभव पाकिस्‍तानचे विश्वचषक विजेत्या माजी कर्णधार इम्रान खान यांच्‍या जिव्‍हारी लागला आहे.  File photo
स्पोर्ट्स

"...तर पाकिस्‍तानमधील क्रिकेट नष्ट होईल" : भारताविरुद्धचा पराभव इम्रान यांच्‍या जिव्‍हारी

'पीसीबी' प्रमुख मोहसिन नक्वी यांच्या कार्यशैलीवरही उपस्‍थित केले सवाल

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : चॅम्‍पियन्‍स ट्रॉफीमध्‍ये भारतीय क्रिकेट संघाकडून झालेला पराभव पाकिस्‍तानचे विश्वचषक विजेत्या माजी कर्णधार इम्रान खान यांच्‍या जिव्‍हारी लागला आहे. मागील काही वर्ष सुमार कामगिरी करणार्‍या पाकिस्‍तान क्रिकेट संघाची आणि देशातील क्रिकेटच्‍या भवितव्‍याची त्‍यांना अचानक काळजी वाटू लागली आहे. भारताने दारुण पराभव केल्‍यानंतर त्‍यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) प्रमुख मोहसिन नक्वी यांच्या कार्यशैलीवरही सवाल करत पसंतीच्या खेळाडूंना निर्णय घेण्याच्या पदांवर बसवले तर पाकिस्‍तानमधील क्रिकेट अखेर नष्ट होईल,"असा इशारा दिला आहे.

आदियाला तुरुंगात पाहिला सामना 

विविध भ्रष्‍टाचार प्रकरणी इम्रान खान सध्‍या रावळपिंडीतील आदियाला तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. रविवार, २३ फेब्रुवारी रोजी त्‍यांनी तुरुंगात भारत-पाकिस्‍तान सामना पाहिला. पाकिस्‍तानचा भारताविरुद्ध झालेल्या पराभव आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमधून संघ बाहेर पडल्‍याने त्‍यांनी निराशा व्‍यक्‍त केली, अशी माहिती त्‍यांची बहिण अलिमा खान यांनी दिली. पाकिस्तानच्या खराब कामगिरीबद्दल इम्रान यांनी तीव्र नाराजी व्‍यक्‍त केली.

पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वींवरही केली टीका 

इम्रान खान यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) प्रमुख मोहसिन नक्वी यांच्या क्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. क्रिकेट प्रशासनातील उच्चपदांवरील नियुक्त्यांबद्दल निराशा व्यक्त केली. ते म्‍हणाले की, जेव्हा पसंतीच्या खेळाडूंना निर्णय घेण्याच्या पदांवर बसवाल तर क्रिकेट अखेर नष्ट होईल," असे इम्रान खान यांनी म्‍हटल्‍याचे अलिमा खान यांनी सांगितले.

पीसीबीचे माजी प्रमुख सेठींनी केले हाेते इम्रान यांच्‍यावर गंभीर आरोप

पीसीबीचे माजी प्रमुख नजम सेठी यांनी पंतप्रधान असताना इम्रान खान यांनी पाकिस्तान क्रिकेटच्या पतनास कारणीभूत ठरल्याचा आरोप केला हाेता. इम्रान खान यांची पंतप्रधानपदी निवड झाल्‍यानंतर पीसीबी प्रमुखपदावरून पायउतार झालेले नजम सेठी यांनी असा दावा केला हाेताक की,"इम्रान खान यांनी देशांतर्गत क्रिकेट रचनेत छेडछाड केली. त्‍यांच्‍या निर्देशानुसार, पीसीबीने देशांतर्गत क्रिकेट रचनेत बदल केले, १६-१८ विभागीय आणि प्रादेशिक संघटनांच्या संघांच्या दीर्घकालीन प्रणालीऐवजी सहा संघांच्या प्रथम श्रेणी स्पर्धेची स्थापना केली. इम्रानचे माजी सहकारी रमीझ राजा यांना २०२१ मध्ये पीसीबी प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते;परंतु इम्रानच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पतनानंतर त्यांना पद सोडावे लागले होते, असेही ते म्‍हणाले.

इम्रान खान यांनीच केला देशांतर्गत क्रिकेट रचनेत बदल : सेठी

"२०१९ मध्ये एका नवीन पंतप्रधानांनी एका नवीन व्यवस्थापनाने पाकिस्तानला दशकांपासून चांगली सेवा देणाऱ्या देशांतर्गत क्रिकेट रचनेत बदल केला. एका अयोग्य ऑस्ट्रेलियन हायब्रिड मॉडेलने बदल केला तेव्हा अधोगती सुरू झाली. राजकीय हस्तक्षेप सुरूच राहिला; परस्परविरोधी पीसीबी धोरणे ही रूढी बनली - परदेशी प्रशिक्षकांना नियुक्त करून त्यांना बाहेर पाठवण्यात आले, निवडकर्त्यांना विचित्रपणे नियुक्त केले गेले, जुन्या खेळाडूंना मार्गदर्शक आणि व्यवस्थापनासाठी नियुक्त केले गेले. संघातील गटबाजीने व्यवस्थापनांवर वर्चस्व गाजवले, आज याचे भयानक परिणाम आपल्यासमोर आहे," असेही सेठी म्‍हणाले हाेते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT