339 धावांचे तगडे आव्हान, समोर ऑस्ट्रेलियासारखा 7 वेळा विश्वचषक जिंकणारा तगडा प्रतिस्पर्धी, भरीत भर म्हणून प्रतीका रावलसारखी बहरातील फलंदाजही जायबंदी होऊन स्पर्धेबाहेर फेकली गेलेली. पण, या साऱ्या प्रतिकूल परिस्थितीतही जिंकली ती भारतीय रणरागिणींचा दुर्दम्य आशावाद! जेमिमा रॉड्रिग्यूजचे खणखणीत शतक, तिने हरमनप्रीतसह केलेली 167 धावांची अविश्वसनीय भागीदारी निर्णायक ठरली आणि याच बळावर भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चीत करत भारताने आयसीसी महिला वन डे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली!
विजयासाठी 339 धावांचे तगडे आव्हान असताना शेफाली वर्मा अवघ्या 10 धावांवर तंबूत परतल्याने भारताला प्रारंभीच पहिला धक्का बसला. सहकारी सलामीवीर स्मृती मानधना देखील 24 धावांवर बाद झाल्यानंतर भारताची 2 बाद 59 अशी स्थिती होती. मात्र, याचवेळी जेमिमा रॉड्रिग्यूज 134 चेंडूत 14 चौकारांसह 127 व हरमनप्रीत कौर 88 चेंडूत 10 चौकार, 2 षटकारांसह 89 यांची जोडी क्रीझवर जमली आणि या उभयतांनी तिसऱ्या गड्यासाठी 167 धावांची धडाकेबाज खेळी साकारत ऑस्ट्रेलियन संघाच्या पायाखालची अक्षरश: वाळू सरकवली.
भारतीय संघाने ४८.३ षटकांतच विजयाचे लक्ष्य यशस्वीरित्या गाठले. भारताच्या विजयात जेमिमा रोड्रिग्सने नाबाद १२७ धावांची ऐतिहासिक खेळी साकारली आणि संघाला अंतिम फेरीत पोहोचवण्यात सिंहाचा वाटा उचलला. अमज्योत कौरने विजयाचा चौकार मारताच, या सामन्यात उत्कृष्ट आणि निर्णायक खेळी साकारणारी जेमिमा रोड्रिग्स मैदानातच भावूक झाली.
आता २ नोव्हेंबर रोजी भारताची अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लढत होणार आहे.
डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात 'कांगारू' संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्व गडी गमावून ३३८ धावांचा डोंगर उभा केला, ज्यात फीबी लिचफील्डने (११९) नेत्रदीपक शतक झळकावले. प्रत्युत्तरात, भारतीय संघाने जेमिमा रॉड्रिग्जच्या (१२७*) शानदार शतकाच्या जोरावर हे मोठे लक्ष्य सहज गाठले.
एलिसा हिली (५) लवकर बाद झाल्यानंतर लिचफील्ड (११९) आणि एलिस पेरी (७७) यांनी ऑस्ट्रेलियन डावाला आकार दिला. मधल्या फळीत ॲश्ले गार्डनरने ४५ चेंडूंमध्ये ६३ धावांची झंझावाती खेळी करत संघाला ३०० धावांच्या पार पोहोचवले.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. शेफाली वर्मा (१०) आणि स्मृती मानधना (२४) हे सलामीचे फलंदाज लवकर बाद झाले. त्यानंतर, रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (८९) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अखेरीस, दीप्ती शर्मा (२६) आणि रिचा घोष (२६) यांनी महत्त्वपूर्ण योगदान देत भारताला विजय मिळवून दिला.
लिचफील्डने अष्टपैलू पेरीसोबत दुसऱ्या विकेटसाठी १३३ चेंडूंमध्ये १५५ धावांची विक्रमी भागीदारी रचली. लिचफील्डने ९३ चेंडूंचा सामना करताना ११ चौकार आणि ३ षटकारांसह ११९ धावा कुटल्या. हे तिच्या वनडे कारकिर्दीतील तिसरे, तर भारताविरुद्धचे दुसरे शतक ठरले, जे तिने ७७ चेंडूंमध्ये पूर्ण केले. विशेष म्हणजे, हे तिचे वनडे विश्वचषकातील पहिलेच शतक ठरले.
पेरीने ६६ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. तिने ८८ चेंडूंचा सामना करताना ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७७ धावांची उत्कृष्ट खेळी केली. हे तिच्या वनडे कारकिर्त्यातील ३७वे आणि भारताविरुद्धचे ८वे अर्धशतक ठरले. क्रिकइन्फोनुसार, पेरीने विश्वचषकात आतापर्यंत ३२ सामने खेळले असून, ४९.८८ च्या प्रभावी सरासरीने एकूण ८४८ धावा केल्या आहेत.
मधल्या फळीत फलंदाजीला आलेल्या ॲश्ले गार्डनरने ४५ चेंडूंत ४ चौकार आणि तेवढ्याच षटकारांच्या मदतीने ६३ धावांची तुफानी खेळी केली. तिचा डाव धावबाद झाल्याने संपुष्टात आला. आठव्या विकेटच्या रूपात ती पॅव्हेलियनमध्ये परतली. शेवटच्या षटकांमध्ये वेगाने धावा जमा करत तिने संघाला ३०० च्या पुढे नेण्यात मोलाची भूमिका बजावली.
लिचफील्ड महिला वनडे विश्वचषक नॉकआउट सामन्यांमध्ये शतक झळकावणारी तिसरी ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरली आहे. तिच्यापूर्वी एलिसा हिली (२०२२ उपांत्य आणि अंतिम) आणि कॅरेन रोल्टन (२००५ अंतिम) यांनी हा पराक्रम केला होता.
केवळ २२ वर्षे १९५ दिवसांची असताना, लिचफील्ड महिला विश्वचषक नॉकआउटमध्ये शतक झळकावणारी सर्वात युवा फलंदाज देखील बनली आहे. यासह, ती ऑस्ट्रेलियाकडून या स्पर्धेत शतक झळकावणारी दुसरी सर्वात युवा खेळाडू ठरली आहे.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने १३ धावांवर पहिली विकेट गमावली असताना रॉड्रिग्ज फलंदाजीसाठी मैदानावर आली. दबावाच्या परिस्थितीतही तिने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना करत धावांचा ओघ कायम ठेवला. तिने ५७ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. ७२ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर असताना तिला जीवदान मिळाले, जेव्हा प्रतिस्पर्धी कर्णधार ऍलिसा हिलीने तिचा सोपा झेल सोडला. तिने ११५ चेंडूंमध्ये आपले शानदार शतक पूर्ण केले.
५९ धावांवर भारताची दुसरी विकेट पडली, तेव्हा कर्णधार हरमनप्रीत कौर क्रीजवर आली. तिने सुरुवातीला संयमाने फलंदाजी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. एकदा मैदानावर स्थिरावल्यानंतर तिने धावगती वाढवत आकर्षक फटकेबाजी केली. तिने ८८ चेंडूंमध्ये १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ८९ धावांची उत्कृष्ट खेळी करून आपले योगदान दिले.
भारतीय सलामी फलंदाज मानधनाने २४ चेंडूंमध्ये २४ धावांची खेळी केली. या दरम्यान तिने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यांमध्ये आपल्या १,००० धावांचा टप्पा पूर्ण केला. तिच्यापूर्वी भारताची मिताली राजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा विक्रम केला होता. माजी भारतीय कर्णधार मितालीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३७ डावांमध्ये ३४.०३ च्या सरासरीने १,१२३ धावा केल्या होत्या, ज्यात ९ अर्धशतकांचा समावेश आहे.
अखेर, ऑस्ट्रेलियाने सामन्यात परत एकदा दमदार पुनरागमन केले आहे. सदरलँडच्या गोलंदाजीवर रिचा घोष झेलबाद झाली. रिचाची ही छोटी पण स्फोटक खेळी किती महत्त्वाची होती, हे आता वेळच सांगेल.
सदरलँडने संपूर्ण षटकात साधारणपणे 'गुड लेंग्थ'वर गोलंदाजी केली होती, पण निर्णायक वेळी तिने ऑफ-स्टंपबाहेर एक अतिशय आखूड चेंडू टाकला. रिचाने दोन्ही पाय हवेत असताना, तो चेंडू ऑफ-साईडला 'कट' करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचे टायमिंग चुकले आणि चेंडू हवेत उंच जाऊन शॉर्ट थर्ड मॅनवर उभ्या असलेल्या किम गार्थच्या हातात विसावला. रिचा घोषने २६ धावा केल्या.
भारतीय फलंदाज जेमिमा रोड्रिग्सला या सामन्यात पुन्हा एकदा 'जीवनदान' मिळाले आहे. तिचा झेल सुटण्याची या सामन्यातील दुसरी वेळ आहे. यापूर्वी, यष्टिरक्षक अॅलिसा हीलीने तिचा झेल सोडला होता. आता, १०० धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर तिचा दुसरा झेल ताहलिया मॅकग्राने सोडला. यावेळी ती १०६ धावांवर खेळत होती.
जेमिमा रोड्रिग्सचे हे शतक भारतीय महिला क्रिकेटसाठी एक मोठी कामगिरी आहे. महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरीत भारतासाठी झळकलेले हे फक्त दुसरे शतक आहे. यापूर्वी, २०१७ मध्ये हरमनप्रीत कौरने साकारलेली १७१ धावांची अविस्मरणीय नाबाद खेळी ही पहिली होती.
एका विश्वचषक नॉकआऊट सामन्यात दोन फलंदाजांनी वैयक्तिक शतके झळकावण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, २०२२ च्या अंतिम सामन्यात अॅलिसा हीली आणि नॅट सायव्हर-ब्रंट यांनी अशी कामगिरी केली होती.
41.4 व्या षटकात एक धाव घेत, जेमिमा रोड्रिग्सने आपले शानदार शतक पूर्ण केले. श्रीलंकेविरुद्धच्या भारताच्या पहिल्या सामन्यात ती पहिल्याच चेंडूवर बाद झाली होती आणि नंतर तिला संघातून वगळण्यात आले होते. तिला फलंदाजीसाठी तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळाली आणि तिने विश्वचषक उपांत्य सामन्यात शतक झळकावून जोरदार पुनरागमन केले आहे. शतकानंतरचा तिने जल्लोष करणे टाळले. तिने फक्त रिचा घोषशी थोडक्यात संवाद साधला आणि पुढे खेळायला लागली. तिचे संपूर्ण लक्ष आणि एकाग्रता स्पष्टपणे दिसत होती.
तिने ऑफ-स्टंपच्या बाहेर टाकलेला शॉर्ट ऑफ लेंग्थ चेंडू लांब स्विंग करत लाँग-ऑनला ढकलला आणि धाव पूर्ण केली. शतक झाल्यावरही ती लगेच पुढच्या चेंडूसाठी सज्ज झाली.
४०.५ व्या षटकांत भारताला मोठा धक्का बसला. दीप्ती शर्मा धावबाद झाली. एक अतिशय महत्त्वाची विकेट फुकट गमावली गेली. दीप्ती शर्मा विकेट्स दरम्यान धाव घेण्यात फारशी चांगली नाही, आणि ही धाव तर खूपच 'टाईट' होती.
रोड्रिग्सने पुढे येऊन down the track चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हलकेच टोलवला, जिथे क्षेत्ररक्षक किम गार्थ सज्ज होती. गार्थने चेंडू सफाईदारपणे उचलला आणि यष्टिरक्षक हीलीकडे अचूक फेकला. हीलीने बाकीचे काम पूर्ण केले. दीप्ती शर्मा खूप मागे होती. तिला पूर्ण लांबीचा 'डायव्ह' मारण्याची आवश्यकता होती, पण तसे केले असते तरी ती वाचणे कठीण होते. दीप्ती शर्माने २४ धावा केल्या.
भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिचे शतक अवघ्या ११ धावांनी हुकले. तिने ८८ चेंडूंमध्ये ८९ धावांची नेत्रदीपक खेळी करून बाद झाली. अॅनाबेल सदरलँडने हरमनप्रीत आणि जेमिमा यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी झालेली १७६ धावांची जबरदस्त भागीदारी तोडली.
भारतीय क्रिकेट संघाच्या धावसंख्येने २२० चा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, फलंदाज जेमिमा रोड्रिग्सला एकाच डावात पुन्हा एकदा 'जीवनदान' मिळाले. यापूर्वी, यष्टीरक्षक हीलीने तिचा झेल सोडला होता. आता ती डीआरएस (DRS) मध्ये वाचली. मात्र, मैदानावरील पंचांनी तिला 'नॉट आऊट' ठरवले होते. ३४.४ षटकांनंतर भारताची धावसंख्या २ बाद २२१ अशी आहे.
भारतीय संघाला आणि विशेषतः जेमिमा रोड्रिग्सला एक अत्यंत मोठे 'जीवनदान' मिळाले. ती ८२ धावांवर खेळत असताना, ऑस्ट्रेलियन कर्णधार अलिसा हिलीने तिचा सोपा झेल सोडला. या चुकीचा फायदा भारताला नक्कीच होईल.
भारतीय संघाने स्वतःला आता अतिशय मजबूत स्थितीत आणून ठेवले आहे. एकीकडे सातत्याने धावा होत आहेत आणि दुसरीकडे जेमिमा व हरमनप्रीत या दोन्ही खेळाडू मैदानात खंबीरपणे उभ्या आहेत; त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ पूर्णपणे दबावाखाली आला आहे.
भारतीय संघाने ३१ षटकांमध्ये २ गडी गमावून १९८ धावा केल्या आहेत. कर्णधार हरमनप्रीत कौर (६६ धावा) आणि जेमिमा रोड्रिग्स (८१ धावा) सध्या खेळपट्टीवर तळ ठोकून आहेत. या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी १३० धावांची दणदणीत भागीदारी पूर्ण केली आहे.
भारताला पुढील ११४ चेंडूंमध्ये १४१ धावांची गरज आहे आणि त्यांच्या ८ विकेट्स अजूनही शिल्लक आहेत. या आकडेवारीमुळे सामन्यात भारताचे पारडे आता स्पष्टपणे जड झाले आहे.
जेमिमा रोड्रिग्स आणि हरमनप्रीत कौर यांनी तिसऱ्या विकेटसाठी आतापर्यंत १०४ धावांची शतकी भागीदारी पूर्ण केली आहे. जेमिमा ६६ तर हरमन ४६ धावांवर खेळत आहेत. भारतीय संघाने २६ षटकांमध्ये केवळ दोन गडी गमावून १६३ धावा केल्या आहेत. या भागीदारीमुळे भारतीय संघाने या सामन्यात आपली स्थिती अधिक मजबूत केली आहे.
भारतीय संघाची धावसंख्या आता १५० चा टप्पा पार करून पुढे गेली आहे. २५.४ षटकांत भारताने २ गडी गमावून १५८ धावा फलकावर लावल्या आहेत. जेमिमा ६६ तर हरमनप्रीत कौर ४१ धावांवर खेळत आहेत. या दोघींमधील भागीदारीदेखील आता ९९ धावांची झाली आहे.
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर (३७ धावा) आणि जेमिमा रोड्रिग्स (५५ धावा) सध्या मैदानात तळ ठोकून आहेत. या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी आतापर्यंत ७९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली आहे. भारताला विजयासाठी पुढील २७ षटकांमध्ये २०२ धावांची आवश्यकता आहे.
परिणामी, ऑस्ट्रेलियन संघात आता चुका दिसू लागल्या आहेत. 'ओव्हरथ्रो' आणि अनेक 'मिसफिल्ड्स' वारंवार घडताना दिसत आहेत. भारताने २३ षटकांमध्ये २ गडी गमावून १३८ धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिला विश्वचषक उपांत्य फेरीत लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या १०० धावा पूर्ण झाल्या आहेत. हरमनप्रीत आणि जेमिमा यांच्यातील उत्कृष्ट भागीदारीमुळे संघाने १०० धावांचा टप्पा ओलांडला.
दोन झटके बसल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी भारतीय संघाचा डाव सावरला आहे. १५ षटकांच्या समाप्तीपर्यंत भारताने २ गडी गमावून ८८ धावा केल्या.
भारताला स्मृती मानधनाच्या रूपाने एक मोठा धक्का बसला. मानधनाला गार्थने हीलीकरवी झेलबाद केले. पंचांनी मानधनाला नॉटआउट घोषित केले होते, परंतु ऑस्ट्रेलियाने घेतलेल्या डीआरएसमध्ये चेंडूचा संपर्क मानधनाच्या बॅटला झाल्याचे स्पष्ट झाले. मानधनाने २४ चेंडूंमध्ये दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २४ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताने ५० धावा पूर्ण केल्या आहेत. मानधना आणि जेमिमा यांनी जबाबदारी घेतली आहे आणि भागीदारी बहरत आहे.
ऑस्ट्रेलियाची गोलंदाज किम गार्थने सलामीवीर शेफाली वर्माला बाद करत भारताला पहिला झटका दिला. शेफालीने अवघ्या पाच चेंडूंमध्ये दोन चौकारांच्या साहाय्याने १० धावा काढून ती तंबूत परतली.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघाच्या डावाला प्रारंभ झाला आहे. भारतासाठी सलामीची जबाबदारी शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना या फलंदाज द्वयीने स्वीकारली आहे. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी ३३९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
फोएब लिचफील्डचे शतक, तर एलिसा पेरी आणि अॅश्ले गार्डनर यांच्या अर्धशतकांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ३३८ धावांपर्यंत मजल मारली आहे. यासह त्यांनी भारतासमोर ३३९ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले आहे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ४९.५ षटकांत ३३८ धावा करून सर्वबाद झाला.
या उपांत्य फेरीच्या महत्त्वाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियासाठी लिचफील्डने उत्कृष्ट फलंदाजी करत शानदार शतक झळकावले. तर एलिसा पेरी आणि अॅश्ले गार्डनर यांनीही अर्धशतकी खेळी करत धावसंख्येला मोठा आकार दिला. लिचफील्ड आणि एलिसा पेरी यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी १५५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करणे शक्य झाले.
फोएब लिचफील्ड (११९) आणि एलिसा पेरी (७७) जोपर्यंत क्रीझवर होत्या, तोपर्यंत ऑस्ट्रेलियाचा संघ ३५० धावांचा टप्पा सहज पार करेल, असे वाटत होते. मात्र, भारतीय गोलंदाजांनी महत्त्वपूर्ण वेळी विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाच्या धावगतीवर नियंत्रण मिळवले.
धोकादायक ठरत असलेली लिचफील्ड आणि पेरी यांची मोठी भागीदारी अमनजोत कौरने फोडली. लिचफील्ड ११२ चेंडूंत ११९ धावा करून बाद झाली आणि ऑस्ट्रेलियाच्या धावगतीला मोठा ब्रेक लागला. लिचफील्ड बाद झाल्यावर एलिसा पेरीने डावाची सूत्रे हाती घेतली. परंतु, श्री चरणी हिने ऑस्ट्रेलियाला एकामागोमाग एक दोन मोठे धक्के दिले. तिने बेथ मूनी (२४) आणि अॅनाबेल सदरलँड (३) यांना झटपट पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर राधा यादवने पेरीच्या उत्कृष्ट खेळीचा शेवट केला. ७७ धावांवर खेळणाऱ्या पेरीला तिने त्रिफळाचीत केले आणि ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या धावसंख्येच्या आशांना सुरुंग लावला.
या सामन्यात ताहिला मैक्ग्रा विशेष कामगिरी करू शकली नाही आणि केवळ १२ धावा काढून धावबाद झाली. मात्र, अखेरीस एश्ले गार्डनरने झंझावाती खेळी करत ऑस्ट्रेलियाचा डाव ३०० धावांच्या पार नेला. गार्डनर ६३ धावांवर धावबाद झाली.
यानंतर, दीप्ती शर्माने डावाच्या शेवटच्या षटकात अलाना किंग (४) आणि सोफी मोलिन्यूक्स या दोघींना खाते उघडण्यापूर्वीच माघारी पाठवले. दीप्तीला हॅट्ट्रिक पूर्ण करता आली नाही; परंतु, किम गार्थ (१७) धावबाद झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ पूर्ण ५० षटके खेळू शकला नाही.
भारतीय गोलंदाजांची कामगिरी
भारताकडून श्री चरणी आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर अमनजोत कौर, क्रांती गौड आणि राधा यादव यांनी प्रत्येकी एक-एक बळी मिळवला.
४१.४ व्या षटकात भारताला सहावी विकेट मिळाली. अमनजोत कौरने फेकलेला चेंडू जो ऑफ-स्टंपच्या बाहेर 'लेंग्थ'वर होता. गार्डनरने तो चेंडू एक्स्ट्रा-कव्हर येथील क्षेत्ररक्षकाच्या दिशेने सरळ टोलवला. याचवेळी गार्डनरने धाव घेण्यासाठी कॉल दिला. जेमिमा रॉड्रिग्सने चेंडू पकडाला आणि अचूक थ्रो केला. तिने चपळाईने चेंडू उचलला आणि यष्टिरक्षक रिचा घोषकडे अचूक फेकला. यावेळी ताहलिया मॅकग्रा धावण्यासाठी थोडी संथ राहिली. रिचा घोषने क्षणाचाही विलंब न करता बेल्स उडवल्या. ऑस्ट्रेलियाने ही विकेट अक्षरशः भारताला भेट दिली. मॅकग्राने १२ धावा केल्या.
भारताला मोठी विकेट मिळाली. एलिसा पेरीचा डाव संपुष्टात आणण्यात राधा यादवला यश आले. पेरी कट शॉट खेळण्यात माहीर आहे, पण यावेळी चेंडू कट करण्यासाठी खूपच पुढे होता. ऑफ-स्टंपवर टाकलेला हा चेंडू वेगाने आत सरकला. पेरीने बॅकफूटवर जाऊन उशिरा कट करण्याचा प्रयत्न केला, पण ती पूर्णपणे चुकली आणि ऑफ-स्टंप उखडला गेला. पेरीने ८८ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७७ धावांची दमदार खेळी केली.
श्री चरणीने पुन्हा एकदा प्रभावी मारा करत ऑस्ट्रेलियाला चौथा झटका दिला. तिने सदरलँडला कॉट अँड बोल्ड करून भारताला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. श्री चरणीने मधल्या स्टंपवर पूर्ण लांबीचा चेंडू टाकला होता. सदरलँडने पुढे सरकत तो ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू खाली दाबण्यात ती अपयशी ठरली. परिणामी, चेंडू हलकासा उसळी घेऊन गोलंदाजीच्या दिशेने गेला आणि श्री चरणीने तो सहज झेलला. विशेष म्हणजे, या विश्वचषकातील सलग दुसऱ्या सामन्यात श्री चरणीने सदरलँडला बाद केले आहे. जलद गतीने दोन बळी मिळाल्याने भारतीय संघाने सामन्यावरील नियंत्रण पुन्हा मिळवण्यास सुरुवात केली आहे.
गोलंदाज श्री चरणी हिला मोठे यश मिळाले. तिने बेथ मूनीला बाद करून ऑस्ट्रेलियाची आणखी एक भागीदारी तोडली. विशेष म्हणजे, लीग सामन्यातही मूनी एक्स्ट्रा-कव्हरवर झेल देऊन बाद झाली होती आणि आज पुन्हा त्याच क्षेत्ररक्षकाकडे (जेमिमाह रॉड्रिग्स) झेल देऊन ती बाद झाली. मूनीने पुढे येऊन एक्स्ट्रा-कव्हरवरून 'इन्साइड-आऊट' फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण तिचे टायमिंग चुकले. मागे धावणाऱ्या जेमिमाह रॉड्रिग्सने हा झेल अगदी सहज पकडला. बेथ मूनीने २२ चेंडूंमध्ये ३ चौकारांच्या मदतीने २४ धावा केल्या. श्री चरणीने ब्रेकनंतर येऊन हा महत्त्वाचा बळी घेतला.
ऑस्ट्रेलियाची अनुभवी खेळाडू एलिस पेरीने भारताविऱुद्धच्या उपांत्य फेरीत आपल्या फॉर्ममध्ये दमदार पुनरागमन करत एक शानदार अर्धशतक झळकावले. तिने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की ती खऱ्या अर्थाने Big Match Player आहे. पेरीच्या या अर्धशतकासह ऑस्ट्रेलियाच्या संघाने २०० धावांचा टप्पा पार केला आहे. सध्या पेरीला बेथ मूनीची उत्तम साथ मिळत आहे.
अखेरीस, अष्टपैलू खेळाडू अमनजोत कौरने भारताला दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची विकेट मिळवून दिली. तिने १३३ चेंडूंमध्ये झालेली १५५ धावांची धोकादायक भागीदारी संपुष्टात आणली. अमनजोतने धडाकेबाज खेळी करणाऱ्या फोएबे लिचफिल्डला ११९ धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. लिचफिल्डने आपल्या ९३ चेंडूंच्या खेळीत नवी मुंबईच्या मैदानावर अक्षरशः वादळ आणले होते आणि भारतीय संघाला पूर्णपणे बचावात्मक खेळायला लावले. अमनजोतच्या गोलंदाजीवर पॅडल स्वीप मारण्याचा प्रयत्न करताना ती बोल्ड झाली. यावेळी ऑस्ट्रेलियाचा स्कोर २ बाद १८० होता.
ऑस्ट्रेलियाच्या फोएबे लिचफिल्डला एक अत्यंत मोठे जीवदान मिळाले आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या पंचानी तिला झेलबाद दिले होते आणि ती पॅव्हेलियनकडे निघाली होती. मात्र, तिसऱ्या पंचांनी या निर्णयाचा आढावा घेतला आणि नंतर हे स्पष्ट झाले की, हा चेंडू बॅटला लागण्यापूर्वी जमिनीवर टप्पा पडून आलेला होता. त्यामुळे, ६२ धावांवर असताना लिचफिल्ड बालंबाल वाचली. गोलंदाज श्री चरणीचे दुर्दैव की, तिला विकेट मिळाली नाही.
एलिस पेरीनेही फलंदाजीत वेग पकडला असून, ती लिचफिल्डला उत्तम साथ देत आहे. तिने आतापर्यंत केवळ ३९ चेंडूंमध्ये ३७ धावा केल्या आहेत. हीलीची विकेट पडल्यानंतर या दोघींनीही संघावर कोणत्याही प्रकारचा दबाव येऊ दिला नाही. यामुळेच ऑस्ट्रेलियाने १९ षटकांमध्ये एक विकेट गमावून १२१ धावा फटकवल्या.
एलिसा हीलीची विकेट मिळाल्यानंतर भारतीय संघाच्या चेहऱ्यावर जो आनंद होता, तो लिचफिल्ड आणि एलिस पेरीच्या आक्रमक खेळीने फिका पाडला आहे. भारतीय गोलंदाज हतबल झाल्याचे दिसत आहेत. विशेषतः, क्रांती गौड सतत खराब गोलंदाजी करत आहे आणि भरमसाठ धावा देत आहे. तिने ५ षटकांमध्ये तब्बल ४९ धावा खर्च केल्या आहेत. पेरी आणि लिचफिल्डच्या फटकेबाजीमुळे भारतीय क्षेत्ररक्षणही कमजोर पडल्याचे दिसून येत आहे. ऑस्ट्रेलियाचा स्कोर: १२१/१
एलिसा हीली लवकर बाद झाल्यानंतर लिचफिल्डने पेरी सोबत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. यासोबतच धावांची गती वाढवली. ती एका बाजूने फटकेबाजी करत होती तर तिला पेरी संयमी साथ देत होती. दोघींनी आक्रमकता आणि संयमतेचा मिलाफ दाखवला. दुसरीकडे भारतीय गोलंदाज विकेट मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसले पण त्यांना काही केल्या यश आले नाही.
13.4 व्या षटकात श्री चरणीच्या गोलंदाजीवर फोएबे लिचफिल्डने पुढे सरसावत मिड-ऑफवरून चेंडू चौकार मारला आणि त्याच क्षणी तिचे नववे एकदिवसीय अर्धशतक पूर्ण झाले. या विक्रमाची तिला लगेच जाणीव झाली नाही, पण नॉन-स्ट्रायकर एंडवर असलेल्या एलिस पेरीने तिला याबाबत माहिती दिली. लिचफिल्डच्या या धारदार खेळीचे ऑस्ट्रेलियन डग-आऊटने जोरदार टाळ्या वाजवून कौतुक केले. फोएबेने बॅट उंचावून प्रेक्षकांच्या अभिनंदनाचा स्वीकार केला.
ऑस्ट्रेलियाच्या डावात एलिस पेरी आणि फोएबे लिचफिल्ड या फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी महत्त्वाची अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियन संघाचा डाव सावरला. त्यांची धावसंख्या ७० च्या पुढे पोहोचली.
महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या या महत्त्वाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने ५० धावांचा टप्पा पार केला आहे. लिचफिल्ड आणि पेरी या दोन्ही फलंदाज सध्या मैदानावर खेळत आहेत.
पावसाच्या व्यत्ययानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पुन्हा सुरू झाला आहे. सध्या क्रीझवर ऑस्ट्रेलियाची अनुभवी फलंदाज एलिस पेरी हिच्यासोबत फोएबे लिचफिल्ड ही सलामीवीर फलंदाज उपस्थित आहे.
ऑस्ट्रेलियाच्या डावातील सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर क्रांती गौडने 'कांगारू' संघाची कर्णधार एलिसा हीलीला (५ धावा) क्लीन बोल्ड केले. २५ धावांच्या स्कोअरवर भारताने ऑस्ट्रेलियाला हा पहिला आणि महत्त्वाचा झटका दिला.
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरकडून तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर एक मोठी चूक झाली. ऑस्ट्रेलियाची सर्वात धोकादायक फलंदाज एलिसा हीली अवघ्या २ धावांवर असताना तिचा सोपा झेल हरमनप्रीतने सोडला. रेणुका सिंह ठाकूरच्या गोलंदाजीवर शॉर्ट मिड-ऑफवर ही संधी निर्माण झाली होती, जी हरमनने गमावली. यासह ऑस्ट्रेलियाला मोठे जीवदान मिळाले.
स्मृती मानधना, शफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, स्नेह राणा, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंह ठाकूर.
भारतीय संघात तीन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. प्रतिका रावल, उमा क्षेत्री आणि हरलीन देओल या तिघींना विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी शेफाली वर्मा, ऋचा घोष आणि क्रांती गौड यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.
एलिसा हिली (कर्णधार/यष्टीरक्षक), फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, बेथ मूनी, अॅनाबेल सदरलँड, अॅश्ले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिनेक्स, किम गार्थ, अलाना किंग, मेगन शुट.
ऑस्ट्रेलियन संघात जॉर्जिया वॉलच्या जागी कर्णधार एलिसा हीलीचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, जॉर्जिया वेअरहॅमच्या जागी सोफी मोलिनॉक्सने संघात पुनरागमन केले आहे.
महिला एकदिवसीय विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपर्यंत एकूण १४ वेळा लढत झाली आहे. यापैकी भारताला केवळ ३ वेळाच विजय मिळवता आला आहे, तर ११ वेळा 'कांगारू' संघाने बाजी मारली आहे. ऑस्ट्रेलियन संघ सलग १५ महिला एकदिवसीय विश्वचषक सामने जिंकण्याच्या विक्रमावर आहे.
या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघाने दंडावर काळी पट्टी बांधली आहे. ऑस्ट्रेलियाचा १७ वर्षीय स्थानिक क्रिकेटपटू बेन अस्टिन याचा मानेवर चेंडू लागल्याने निधन झाले आहे. त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी बहुधा हे केले गेले आहे.
रेणुका ठाकूरने जिथे पहिल्या षटकात केवळ ३ धावा दिल्या होत्या, तिथे दुसऱ्या षटकात क्रांती गौडची सुरुवात निराशाजनक झाली. तिने या षटकात ९ धावा दिल्या, ज्यामुळे ऑस्ट्रेलियन सलामीवीर फीबी लिचफिल्डला गती मिळाली. या षटकात दोन चौकारही लागले. ऑस्ट्रेलियाचा स्कोअर: १२/०
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने पुन्हा एकदा टॉस गमावला. ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हीलीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
ऑस्ट्रेलियन संघ प्रत्येक विभागात मजबूत आहे. जगातील क्वचितच एखादा संघ त्यांच्या कौशल्याची आणि जिद्दीची बरोबरी करू शकेल. परंतु, आज सेमीफायनलमध्ये हा संघ कसा खेळ करतो, यावर सर्वकाही अवलंबून असेल. भारत त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे करू शकतो, याची ऑस्ट्रेलियाला चांगली जाणीव आहे.
महिला विश्वचषक २०२५ च्या या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाच्या कणखर आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. अशा वेळी, कर्णधार हरमनप्रीत कौर आठ वर्षांपूर्वीच्या 'जादुई' खेळीची पुनरावृत्ती करण्यात यशस्वी ठरेल, अशी अपेक्षा तमाम क्रिकेटप्रेमींना आहे. २०१७ मध्ये इंग्लंडमधील डर्बी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात हरमनप्रीतने ११५ चेंडूंमध्ये नाबाद १७१ धावांची केलेली अविस्मरणीय खेळी हा भारतीय महिला क्रिकेटला प्रकाशझोतात आणणारा एक महत्त्वाचा क्षण होता.
या सामन्यातील विजयी संघ २ नोव्हेंबर रोजी याच मैदानावर होणाऱ्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा १२५ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.