स्पोर्ट्स

T20 World Cup 2026 : भारत-पाकिस्तान 14 तारखेला पुन्हा भिडणार! ICCच्या सर्वात मोठ्या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर

icc womens t20 world cup 2026 schedule : भारत आणि पाकिस्तान एकाच गटात

रणजित गायकवाड

दुबई : महिला क्रिकेटमधील सर्वात मोठ्या रणसंग्रामाचे काउंटडाउन सुरू झाले आहे. आयसीसीने महिला टी-२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध केले असून, यामध्ये कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा थरार कधी पाहायला मिळणार, याचा खुलासा झाला आहे. आयसीसीच्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येतील, जिथे सामना केवळ जय-पराजयाचा नसून तो अस्मितेचाही असेल. महिला टी-२० विश्वचषक यंदा १२ जून ते ५ जुलै या कालावधीत इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळवला जाणार असून, यात एकूण १२ संघ सहभागी होणार आहेत.

भारत आणि पाकिस्तान एकाच गटात

स्पर्धेच्या 'गट १' मध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि नेदरलँड्स या संघांचा समावेश आहे. त्यामुळे साखळी फेरीतच प्रेक्षकांना भारत-पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. १४ जून रोजी एजबेस्टन येथे हे दोन संघ एकमेकांशी भिडतील. महिला क्रिकेटमधील ही पारंपरिक द्वंद्व नेहमीच रोमहर्षक ठरते, त्यामुळे या सामन्यासाठी स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरलेले असेल, अशी अपेक्षा आहे.

भारताने अलीकडच्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे, तर ऑस्ट्रेलिया ६ वेळा चॅम्पियन राहिलेला संघ आहे. त्यामुळेच या गटाला 'ग्रुप ऑफ डेथ' म्हटले जात आहे. पाकिस्तानमध्येही मोठ्या उलटफेर करण्याची क्षमता असल्याने भारत-पाक लढत अधिक महत्त्वाची ठरली आहे.

इंग्लंड-स्कॉटलंड लढतीचीही चर्चा

नेपाळमध्ये झालेल्या पात्रता फेरीनंतर बांगलादेश, आयर्लंड, नेदरलँड्स आणि स्कॉटलंड यांनी आपले स्थान निश्चित केले आहे. आता हे संघ यजमान इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजसोबत विजेतेपदासाठी झुंज देतील. साखळी फेरीत २० जून रोजी हेडिंग्ले येथे होणारा इंग्लंड आणि स्कॉटलंडमधील सामनाही विशेष आकर्षणाचे केंद्र असेल. इंग्लंडच्या भूमीवर विश्वचषक स्पर्धेत हे दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना ५ जुलै रोजी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जाईल.

महिला टी-२० विश्वचषकातील गट रचना

गट १ : ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेदरलँड्स

गट २ : वेस्ट इंडिज, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, आयर्लंड, स्कॉटलंड

आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६: संपूर्ण वेळापत्रक (भारतीय वेळेनुसार)

  • १३ जून २०२६ : इंग्लंड वि. श्रीलंका : एजबेस्टन : रात्री ११:००

  • १३ जून २०२६ : स्कॉटलंड वि. आयर्लंड : ओल्ड ट्रॅफर्ड : दुपारी ३:००

  • १३ जून २०२६ : ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका : ओल्ड ट्रॅफर्ड : संध्याकाळी ७:००

  • १३ जून २०२६ : वेस्ट इंडिज वि. न्यूझीलंड : हॅम्पशायर बाउल : रात्री ११:००

  • १४ जून २०२६ : बांगलादेश वि. नेदरलँड्स : एजबेस्टन : दुपारी ३:००

  • १४ जून २०२६ : भारत वि. पाकिस्तान : एजबेस्टन : संध्याकाळी ७:००

  • १६ जून २०२६ : न्यूझीलंड वि. श्रीलंका : हॅम्पशायर बाउल : संध्याकाळी ७:००

  • १६ जून २०२६ : इंग्लंड वि. आयर्लंड : हॅम्पशायर बाउल : रात्री ११:००

  • १७ जून २०२६ : ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश : हेडिंग्ले : दुपारी ३:००

  • १७ जून २०२६ : भारत वि. नेदरलँड्स : हेडिंग्ले : संध्याकाळी ७:००

  • १७ जून २०२६ : दक्षिण आफ्रिका वि. पाकिस्तान : एजबेस्टन : रात्री ११:००

  • १८ जून २०२६ : वेस्ट इंडिज वि. स्कॉटलंड : हेडिंग्ले : रात्री ११:००

  • २१ जून २०२६ : दक्षिण आफ्रिका वि. भारत : ओल्ड ट्रॅफर्ड : संध्याकाळी ७:००

  • २४ जून २०२६ : इंग्लंड वि. वेस्ट इंडिज : लॉर्ड्स : रात्री ११:००

  • २५ जून २०२६ : भारत वि. बांगलादेश : ओल्ड ट्रॅफर्ड : संध्याकाळी ७:००

  • २७ जून २०२६ : इंग्लंड वि. न्यूझीलंड : द ओव्हल : रात्री ११:००

  • २८ जून २०२६ : ऑस्ट्रेलिया वि. भारत : लॉर्ड्स : संध्याकाळी ७:००

नॉकआउट फेरीतले सामने

  • ३० जून २०२६ : सेमीफायनल १, द ओव्हल (संध्याकाळी ७:००)

  • २ जुलै २०२६ : सेमीफायनल २, द ओव्हल (रात्री ११:००)

  • ५ जुलै २०२६ : फायनल, लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड (संध्याकाळी ७:००)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT