मानधना अलीकडच्या महिन्यांत जबरदस्त फॉर्ममध्ये
मानधनाची वनडे क्रमवारीत बादशाहत कायम
गोलंदाजीत दीप्ती शर्माची मोठी प्रगती
भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधनाने आयसीसी महिला एकदिवसीय फलंदाज क्रमवारीत आपले नंबर-१ स्थान अधिक मजबूत केले आहे. महिला विश्वचषकात सलग दोन अर्धशतके झळकावल्यानंतर मानधनाच्या रेटिंगमध्ये वाढ झाली आहे. यापूर्वी मानधनाचे रेटिंग ७९३ होते, जे आता वाढून ८०९ झाले आहे. यामुळे ती तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट रेटिंग ८१८ च्या अगदी जवळ पोहोचली आहे.
इंदूरमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात मानधनाने उत्कृष्ट ८८ धावांची खेळी केली. पण तिच्या या झुंजार खेळीनेही संघाला विजय मिळाला नाही. टीम इंडियाला अवघ्या ४ धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला. असे असले तरी मानधानाच्या रेटिंगमध्ये वाढ झाली आहे. ती आता महत्त्वपूर्ण आघाडीसह जगातील नंबर-१ एकदिवसीय फलंदाज बनलेली आहे.
मानधना अलीकडच्या महिन्यांत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तिच्या शानदार प्रदर्शनामुळे तिला सप्टेंबर २०२५ साठी आयसीसी महिला ‘प्लेअर ऑफ द मंथ’ म्हणून निवडण्यात आले होते. तोच लय तिने विश्वचषकातही कायम ठेवला आहे. इंग्लंडची कर्णधार नॅट सिव्हर-ब्रंट ७२६ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे.
ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हीली सलग दोन शतके झळकावल्यानंतर क्रमवारीत एक स्थान वर चढून संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिकेची फॉर्ममध्ये असलेली फलंदाज टॅझमिन ब्रिट्स एक स्थानाच्या वाढीसह टॉप-१० मध्ये नवव्या स्थानावर पोहोचली आहे. टॉप-१० च्या बाहेरही अनेक खेळाडूंच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर तीन स्थानांची झेप घेऊन १५व्या स्थानावर पोहोचली आहे.
ऑस्ट्रेलियाची फोएबी लिचफील्ड हिने पाच स्थानांनी पुढे सरकून १७व्या, तर इंग्लंडची हेदर नाईट १५ स्थानांची मोठी झेप घेऊन १८व्या क्रमांकावर पोहोचली आहे.
एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडच्या सोफी एक्लेस्टोनने शीर्षस्थानी आपली पकड कायम ठेवली आहे. तर, भारताच्या दीप्ती शर्माने उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर मोठी झेप घेतली आहे. दीप्ती तीन पायऱ्या वर चढून तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. दीप्तीने विश्वचषकात आतापर्यंत ५ सामन्यांत १३ बळी घेतले आहेत.
ऑस्ट्रेलियाची फिरकीपटू अलाना किंग दोन स्थानांनी पुढे सरकत सातव्या स्थानावर पोहोचली आहे. पाकिस्तानच्या त्रिकुटातील नाशरा संधू (११वे), सादिया इक्बाल (संयुक्त १४वे) आणि फातिमा सना (२४वे) यांनाही त्यांच्या कामगिरीचे फळ मिळाले आहे.
अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीतही पाकिस्तानच्या फातिमा सनाने पाच स्थानांची झेप घेत १५वे स्थान गाठले आहे. तर श्रीलंकेची कर्णधार चामारी अटापट्टू एक स्थानाच्या वाढीसह सातव्या स्थानावर पोहोचली आहे.