सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेशने विश्वचषकातून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी बांगलादेशच्या या भूमिकेला जाहीर पाठिंबा दिल्याने आयसीसीची चिंता वाढली आहे.
T20 World Cup ICC warning Pakistan
दुबई : बांगलादेशने टी-२० विश्वचषकातून माघार घेतली आहे. यानंतर भारताला जाणीवपूर्वक टार्गेट करण्यासाठी पाकिस्ताननेही रडीचा डाव सुरू करत बहिष्काराची भाषा सुरू केली आहे. आता याची गंभीर दखल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) घेतली आहे. आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेवर बहिष्कार टाकला, तर त्यांच्यावर अभूतपूर्व निर्बंध लादले जाऊ शकतात, अशा कडक शब्दांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पाकिस्तानला इशारा दिला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तान जागतिक क्रिकेटमध्ये एकाकी पडू शकतो आणि पीसीबीला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.
सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेशने विश्वचषकातून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी बांगलादेशच्या या भूमिकेला जाहीर पाठिंबा दिल्याने आयसीसीची चिंता वाढली आहे. ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, जर पाकिस्ताननेही बांगलादेशचा मार्ग अनुसरला, तर आयसीसी याकडे आपल्या अधिकारांना दिलेले थेट आव्हान म्हणून बघेल. जागतिक स्पर्धांची प्रतिष्ठा राखण्यासाठी आयसीसी पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
पाकिस्तानने टी-२० विश्वचषकातून माघारमाघार घेतल्यास आयसीसी ‘अभूतपूर्व’ निर्बंध लादू शकते. ते खालीलप्रमाणे—
पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) परदेशी खेळाडूंना खेळण्यास बंदी घातली जाऊ शकते.
आयसीसीकडून मिळणाऱ्या निधीत मोठी कपात झाल्यामुळे पीसीबीचे कंबरडे मोडू शकते.
पीएसएलला मिळणारी आंतरराष्ट्रीय मान्यता आणि व्यावसायिक पाठबळ काढून घेतले जाऊ शकते.
पाकिस्तानला ‘आशिया चषक’ स्पर्धेतून बाहेर काढले जाऊ शकते.
पाकिस्तानसोबतच्या सर्व द्विपक्षीय क्रिकेट मालिका स्थगित केल्या जाऊ शकतात.
आयसीसीने निर्बंध घातल्यास पाकिस्तान क्रिकेटच्या अस्तित्वासाठी ते धोकादायक ठरू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. या वादावर बोलताना पीसीबी अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी स्पष्ट केले की, विश्वचषकात सहभागी व्हायचे की नाही, याचा अंतिम निर्णय सरकार घेईल. पंतप्रधान शहबाज शरीफ परदेशातून परतल्यानंतरच यावर शिक्कामोर्तब होईल. नकवी म्हणाले, “आमची भूमिका पाकिस्तान सरकार सांगेल तीच असेल. आम्ही आयसीसीच्या नाही, तर सरकारच्या आदेशांचे पालन करतो.” या संकटावर मात करण्यासाठी पीसीबीकडे ‘प्लॅन ए, बी, सी आणि डी’ तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, पडद्यामागे पीसीबीला या बहिष्काराचे होणारे दूरगामी परिणाम ठाऊक असल्याची चर्चा आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव आणि ठिकाणांच्या नियोजनावरून बांगलादेशचा आयसीसीसोबत वाद झाला होता. विशेषतः आयपीएल २०२६ मधून मुस्तफिजुर रहमानला मुक्त करण्यात आल्यानंतर तणाव वाढला. बांगलादेशने आपल्या सामन्यांचे आयोजन श्रीलंकेत करण्याची मागणी केली होती, जी आयसीसीने सुरक्षा तपासणीचा हवाला देत फेटाळून लावली. त्यानंतर बांगलादेशने अधिकृतपणे बहिष्कार टाकला असून, त्यांच्या जागी आता स्कॉटलंडचा समावेश करण्यात आला आहे.