पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC T20 Ranking : आयसीसीने टी-20 गोलंदाजांची क्रमवारी बुधवारी (दि. 5) जाहीर केली. या यादीत टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला सर्वाधिक फायदा झाला आहे. त्याने 3 स्थानांनी प्रगती करत दुसरे स्थान पटकावले आहे. आता फक्त वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज अकील हुसेन त्याच्या पुढे आहे.
गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला वरुणने आयसीसी क्रमवारीत 25 खेळाडूंना मागे टाकले होते. त्यानंतर तो 5व्या स्थानी पोहचला. अवघ्या 7 दिवसांनी वरुणने पुन्हा एकदा त्याच्या यशाचा आलेख सुधारत 705 रेटिंगसह दुस-या स्थानी झेप घेतली आहे. तो जगातील नंबर वन गोलंदाज होण्याच्या अगदी जवळ पोहचला आहे. इंग्लंडचा आदिल रशीदही (705) याच स्थानी आहे.
इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत वरुणची कामगिरी उत्कृष्ट झाली. त्याने 5 सामन्यांच्या मालिकेत 9.86 च्या सरासरीने 14 विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 7.67 राहिला. त्याने एका डावात 5 विकेट्सची किमया केली.
इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील वरुण चक्रवर्तीची कामगिरी पाहून भारतीय संघ व्यवस्थापनाने त्याला वनडे मालिकेच्या संघातही समाविष्ट केले आहे. वरुणचा अचानक वनडे संघात समावेश झाल्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
वरुणने आतापर्यंत भारतासाठी फक्त टी-20 सामने खेळले आहेत. अशा परिस्थितीत, जर कर्णधार रोहित शर्माने त्याला इंग्लंडविरुद्धच्या अंतिम प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान दिले तर त्याची वनडे कारकीर्दही येथून सुरू होऊ शकते.
आयसीसी टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीतील टॉप 10 मध्ये भारतचे एकूण तीन खेळाडू आहेत. यामध्ये वरुणसह रवी बिश्नोई (671 रेटिंग) सहाव्या आणि अर्शदीप सिंग (652 रेटिंग) 9व्या क्रमांकावर आहेत. बिश्नोईला 4 स्थानांचा फायदा झाला आहे. तर अर्शदीप सिंगला एका स्थानाने नुकसान झाले आहे.