स्पोर्ट्स

ICC Ranking : सूर्यकुमार यादवची झेप; न खेळताही क्रमवारीत झाला मोठा फायदा

ICC T20I rankings : अभिषेक शर्मा अव्वल स्थानी कायम

रणजित गायकवाड

दुबई : आयसीसी टी-२० क्रमवारीत पुन्हा एकदा मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे, भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने गेल्या काही दिवसांत एकही सामना खेळलेला नसतानाही त्याला क्रमवारीत फायदा झाला असून, त्याने थेट सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

आयसीसीने फलंदाजांची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांत फारसे आंतरराष्ट्रीय टी-२० सामने झाले नसल्याने क्रमवारीत फार मोठे बदल अपेक्षित नव्हते, मात्र तरीही काही अंशी उलथापालथ पाहायला मिळत आहे. मैदानात न उतरताही सूर्यकुमार यादवच्या क्रमवारीत झालेली सुधारणा हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

अभिषेक शर्मा अव्वल स्थानी कायम

आयसीसीच्या ताज्या टी-२० क्रमवारीत भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा ८७५ रेटिंग गुणांसह पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. पाठोपाठ इशान किशन ८७१ गुणांसह दुसऱ्या स्थानी असून पाकिस्तानचा साहिबजादा फरहान (८४८ गुण) तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा फिल साल्ट चौथ्या, तर श्रीलंकेचा पथुम निसांका पाचव्या स्थानावर आहे. भारताचा युवा फलंदाज तिलक वर्मा ७४२ रेटिंग गुणांसह सहाव्या क्रमांकावर कायम आहे.

सूर्याची दोन स्थानांनी प्रगती; सातव्या क्रमांकावर धडक

क्रमवारीतील पहिल्या सहा फलंदाजांच्या स्थानात कोणताही बदल झालेला नाही. मात्र, सूर्यकुमार यादव आता ७२२ रेटिंग गुणांसह सातव्या स्थानावर पोहोचला आहे. सूर्याच्या रेटिंग गुणांमध्ये कोणताही बदल झाला नसला, तरी त्याने दोन स्थानांची सुधारणा केली आहे. कोणताही सामना न खेळता एखादा खेळाडू क्रमवारीत पुढे कसा जाऊ शकतो, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

न खेळताही कसा झाला फायदा?

सूर्यकुमार यादवला झालेल्या या फायद्याचे मुख्य कारण न्यूझीलंडचा फलंदाज टिम सिफर्ट ठरला आहे. सध्या न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० मालिका सुरू आहे. नियमानुसार, जर एखाद्या देशाची मालिका सुरू असेल आणि त्या संघाचा नियमित खेळाडू प्लेइंग इलेव्हनचा भाग नसेल, तर त्याच्या रेटिंग गुणांमध्ये कपात केली जाते. टिम सिफर्ट या मालिकेत खेळत नसल्याने त्याच्या रेटिंगमध्ये घट होऊन ती ७१९ वर आली आहे. परिणामी, सूर्यकुमार यादव आपल्या जुन्याच रेटिंगसह (७२२) सिफर्टच्या पुढे निघून सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

डेवाल्ड ब्रेविसला फटका, जोस बटलरला लाभ

याच मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा डेवाल्ड ब्रेविस देखील खेळत नसल्याने त्याला फटका बसला असून तो दोन स्थानांनी घसरून १० व्या क्रमांकावर आला आहे. याचा फायदा इंग्लंडच्या जोस बटलरला झाला असून, तो एक स्थान वर सरकून ९ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. क्रिकेटच्या मैदानात न उतरताही रेटिंगच्या तांत्रिक गणितामुळे खेळाडूंच्या क्रमवारीत होणारे हे बदल अत्यंत रंजक ठरत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT