पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC T20i Ranking : भारतीय संघाचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्या पुन्हा एकदा आयसीसी क्रमवारीत नंबर 1 अष्टपैलू खेळाडू बनला आहे. त्याने इंग्लंडच्या लियाम लिव्हिंगस्टनला मागे टाकून अव्वल स्थान पटकावले. पंड्याने द. आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत बॅट आणि बॉल दोन्हीसह अप्रतिम कामगिरी केली होती.
पंड्या व्यतिरिक्त, संजू सॅमसन आणि युवा फलंदाज तिलक वर्मा यांनी ताज्या आयसीसी क्रमवारीत मोठी प्रगती केली आहे. तिलकने 69 स्थानांची झेप घेतली असून तो थेट टॉप-5 मध्ये पोहचला आहे.
तिलक वर्मा काही काळ टीम इंडियातून बाहेर होता. पण त्याला द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत संधी मिळाली. कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी पाठवले. याचा फायदा तिलकला झाला. 22 वर्षीय फलंदाजाने सलग दोन शतके झळकावली. प्रथम सेंच्युरियनमध्ये 107 आणि त्यानंतर जोहान्सबर्गमध्ये नाबाद 120 धावांची खेळी साकारली. या मालिकेत त्याने 140 च्या सरासरीने 280 धावा फटकावल्या. त्याने 20 षटकार आणि 21 चौकार ठोकले. त्याचा स्ट्राईक रेटही 198.58 राहिला. यामुळेच त्याला आयसीसी टी-20 क्रमवारीत टॉप 3 मध्ये एंट्री मिळाली आहे. तिलकने तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सूर्यकुमार यादवला मागे टाकले. सूर्या आता चौथ्या स्थानावर घसरला आहे. तिलकने द. आफ्रिकेविरुद्धच्या चार सामन्यांच्या चार डावात 280 धावा फटकावल्या.
द. आफ्रिकेविरुद्धच्या चार सामन्यांच्या टी-20 मालिकेत संजू सॅमसनच्या बॅटमधून दोन शतके झळकली. या खेळींच्या जोरावर त्याने 17 स्थानांनी झेप घेतली आहे. तो आता 22 व्या स्थानावर पोहोचला आहे. सॅमसनने चार सामन्यांच्या चार डावात 216 धावा केल्या.
टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड अव्वल, तर इंग्लंडचा फिल सॉल्ट दुसऱ्या स्थानावर आहे. तिलक वर्मा आणि सूर्य कुमार यादव यांच्याशिवाय यशस्वी जैस्वालचाही टॉप-10 मध्ये समावेश आहे. जैस्वाल आठव्या क्रमांकावर आहे.
द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सूर्याची बॅट अजिबात चालली नाही. या खेळाडूला 3 डावात केवळ 26 धावा करता आल्या. त्याची सरासरी 9 पेक्षा राहिली. परिणामी त्याला ICC T20 क्रमवारीत नुकसान सहन करावे लागले.