कोलंबो : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये सध्या अनपेक्षित निकालांची आणि खेळाडूंच्या विस्मयकारक कामगिरीची मालिका पाहायला मिळत आहे. सोमवारी स्कॉटलंड आणि इटली यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात स्कॉटलंडच्या मायकेल लीस्कने अष्टपैलू खेळाचे असे काही प्रदर्शन केले की, क्रिकेटप्रेमी थक्क झाले. केवळ ५ चेंडूंची फटकेबाजी आणि त्यानंतर घातक गोलंदाजीच्या जोरावर त्याने 'सामनावीर' हा किताब आपल्या नावे केला.
बांगलादेशने स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे स्कॉटलंडला या विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली आणि त्यांनी या संधीचे सोने केले. इटलीविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने निर्धारित २० षटकांत २०७ धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर जॉर्ज मुन्सीने ५४ चेंडूंत ८४ धावांची (१३ चौकार, २ षटकार) झंझावाती खेळी करत पाया रचला.
सामन्याचे खरे आकर्षण ठरला तो मायकेल लीस्क. डावाच्या अखेरीस फलंदाजीला आलेल्या लीस्कने केवळ ५ चेंडूंचा सामना केला आणि त्यात २२ धावा कुटल्या. विशेष म्हणजे, या ५ चेंडूंमध्ये त्याने २ चौकार आणि २ षटकार खेचले, त्याने एकही चेंडू वाया घालवला नाही. खेळलेल्या प्रत्येक चेंडूवर धाव काढली.
फलंदाजीनंतर गोलंदाजीमध्येही लीस्कने इटलीच्या फलंदाजांना नाकीनऊ आणले. त्याने आपल्या ४ षटकांच्या कोट्यात अवघ्या १७ धावा देऊन इटलीचे ४ महत्त्वाचे बळी टिपले. त्याच्या या भेदक माऱ्यामुळे इटलीचा डाव १६.४ षटकांत १३४ धावांवर गडगडला.
स्कॉटलंडने हा सामना ७३ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकून स्पर्धेत पुनरागमन केले आहे. पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजकडून पराभूत झाल्यानंतर स्कॉटलंडने या विजयासह २ गुण मिळवले आहेत. या विजयामुळे ग्रुप 'सी' मधील समीकरणे बदलली असून, स्कॉटलंड आता गुणतालिकेत थेट दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, स्कॉटलंडने निव्वळ धावगतीच्या जोरावर बलाढ्य इंग्लंडला तिसऱ्या स्थानावर ढकलले आहे. या गटात वेस्ट इंडिज सध्या अव्वल स्थानी आहे. आता स्कॉटलंडची ही विजयी घोडदौड पुढील सामन्यांमध्ये कशी कायम राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.