नवी दिल्ली : बांगलादेशच्या सहभागाबाबतचा पेच जवळपास सुटला असून, लवकरच त्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, आता सर्वांच्या नजरा पाकिस्तानच्या भूमिकेकडे लागल्या आहेत. आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ सुरू व्हायला आता अवघे १५ दिवस उरले असताना, अनेक तांत्रिक पेच अद्याप सुटलेले नाहीत. आयसीसीने दीर्घ चर्चेनंतर बांगलादेशचा मुद्दा मार्गी लावला असला तरी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) अद्याप आपल्या संघाची घोषणा न केल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
बांगलादेश क्रिकेट संघ या विश्वचषकात खेळणार की नाही, याचा निर्णय आता सर्वस्वी बांगलादेश क्रिकेट बोर्डाला (BCB) घ्यावा लागणार आहे. आयसीसीने स्पष्ट भूमिका मांडली आहे की, बांगलादेशला त्यांचे सामने खेळण्यासाठी भारतात यावेच लागेल. जर संघाने नकार दिला, तर त्यांना स्पर्धेतून बाद ठरवले जाईल आणि त्यांच्या जागी 'स्कॉटलंड' संघाचा समावेश केला जाईल.
आयसीसीने दिलेल्या स्पष्ट इशाऱ्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डात कमालीची खळबळ उडाली आहे. आयसीसीने दिलेली एक दिवसाची मुदत आज (गुरुवार) सायंकाळी संपत आहे. दरम्यान, पीसीबीने गुरुवारी दुपारी तीन वाजता खेळाडू आणि व्यवस्थापनाची तातडीची बैठक बोलावली असून, त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. आता बांगलादेशसमोर दोनच पर्याय उरले आहेत: एकतर भारतात येऊन खेळणे किंवा विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडणे.
पाकिस्तानने यापूर्वी संकेत दिले होते की, जर बांगलादेशने स्पर्धेवर बहिष्कार टाकला तर तेदेखील बाहेर पडू शकतात. मात्र, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. विशेष म्हणजे, पीसीबीने अद्याप टी-२० विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केलेला नाही. पीसीबीने गोपनीयरीत्या संघाची यादी आयसीसीकडे पाठवली असण्याची शक्यता असली तरी, खेळाडूंची नावे अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाहीत.
विश्वचषकापूर्वी पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे, ज्याचा पहिला सामना २९ जानेवारीला होणार आहे. या मालिकेसाठीही अद्याप संघ जाहीर झालेला नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडलेला संघच विश्वचषकात खेळेल असे मानले जात होते, परंतु विलंब वाढत चालला आहे. याच दरम्यान पाकिस्तानी खेळाडूंनी आपला सरावही थांबवला असून, हा बहिष्काराचा भाग तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. बांगलादेशच्या निर्णयानंतर पाकिस्तान नेमकी काय भूमिका घेतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.