पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 फेरीत बांगलादेशला नमवत अफगाणिस्तान सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. अत्यंत रोमहर्षक सामन्यात विजयावर मोहर उमटवत प्रथमच ICC स्पर्धेच्या मीफायनलमध्ये प्रवेश करण्याचा पराक्रम या संघाने केला आहे. अफगाणिस्तानच्या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलिया संघ टी- 20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडले आहे.
अफगाणिस्तानने बांगलादेशसमोर 116 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 20 षटकांत 5 गडी गमावून 115 धावा केल्या. राशिद खानने 10 चेंडूत तीन षटकार ठोकत 19 धावा केल्या. तर करीम जनात सात धावा करून नाबाद राहिला.
बांगलादेशचा संघ फलंदाजीला आला तेव्हा पावसाने अनेकदा व्यत्यय आणला. बांगलादेशला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी 12.1 षटकात 116 धावा करायच्या होत्या. मात्र, अफगाणिस्तान संघाची सर्व मदार गोलंदाजांवर होती. त्यानी ठराविक अंतराने विकेट घेतल्या. तनजी हसन (0), कर्णधार नजमुल हुसेन शांतो (5) आणि शाकिब अल हसन (0) यांना विशेष काही करता आले नाही. यानंतर राशिद खानची जादू पाहायला मिळाली. त्याने सौम्या सरकार, तौहीद हृदयॉय, महमुदुल्लाह आणि रिशाद हुसेन यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
एकीकडे बांगला देशचे फलंदाज तंबूत परतत असताना एकटा लिटन दास याने एका बाजूने डाव सावरण्याचा प्रयत्न सुरु ठेवा. त्याने आपल्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 11 वे अर्धशतक झळकावले. पावसामुळे सामना मध्यंतरी थांबवण्यात आला आणि पंचांनी एक षटक कमी केले. डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशला 19 षटकांत 114 धावांचे लक्ष्य मिळाले. बांगलादेशने 80 धावांत सात विकेट गमावल्या होत्या. गुलबद्दीन नायबने तंजीम हसन शाकिबला बाद केल्याने सामना अधिकच रोमहर्षक झाला. लिटन दास आणि तस्किन अहमद क्रीजवर होते. लिटन बांगला देशला सामना जिंकून देणार असे चित्र हाेते.
बांगलादेशला शेवटच्या 12 चेंडूत 12 धावांची गरज होती. नवीन उल हक गोलंदाजीला आला आणि त्याने सलग दोन चेंडूंवर तस्किन अहमद आणि मुस्तफिझूर रहमान यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवून अफगाणिस्तानला उपांत्य फेरीत नेले.
अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. यासह ऑस्ट्रेलियन संघ टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. बांगलादेश संघाच्या कामगिरीवर ऑस्ट्रेलिया संघाची मदार होती. कमी धावसंख्येच्या या सामन्यात एका क्षणी बांगलादेश जिंकेल असे चित्र हाोते. याचा फायदा ऑस्ट्रेलियाला झाला असता, पण अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले, विकेट्स घेतल्या आणि विजय मिळवला.
आता 27 जूनला पहिल्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. त्याचबरोबर दुसऱ्या उपांत्य फेरीत भारतीय संघाचा सामना इंग्लंडशी होणार आहे.