पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC T20 Ranking : आयसीसीने बुधवारी (दि. 2) जाहीर केलेल्या टी-20 क्रमवारीत, भारताचा हार्दिक पंड्या 252 रेटिंगसह अष्टपैलू क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. तर गोलंदाजीच्या क्रमवारीत मिस्ट्री फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला फटका बसला आहे. त्याची एका स्थानाने घसरण झाली असून तो आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत, पंड्यानंतर नेपाळचा दीपेंद्र सिंग ऐरी (233 रेटिंग) दुसऱ्या तर ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टोइनिस (210) रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीत भारताचे अक्षर पटेल आणि अभिषेक शर्मा अनुक्रमे 12 व्या आणि 13 व्या स्थानावर आहेत. आयर्लंडचा मार्क अडायर एका स्थानाची सुधारणा केली असून तो आता 19 व्या स्थानावर पोहोचला आहे, तर न्यूझीलंडचा मिशेल सँटनरचे नुकसान झाले आहे. तो एका स्थानाने घसरून 20 व्या स्थानावर पोहोचला आहे.
टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत, न्यूझीलंडच्या जेकब डफीने (723) चार स्थानांनी झेप घेतली आहे. तो आता अव्वल स्थानावर पोहोचला आहे, तर वेस्ट इंडिजचा अकील हुसेन (707), भारताचा वरुण चक्रवर्ती (706) आणि इंग्लंडचा आदिल रशीद हे प्रत्येकी एका स्थानाने घसरून अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा आणि अॅडम झांपा हे प्रत्येकी एका स्थानाने घसरून अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आले आहेत. आयसीसी टी-20 गोलंदाजी क्रमवारीत भारताचा रवी बिश्नोई (674) सातव्या आणि अर्शदीप सिंग (653) 10व्या स्थानावर आहे.
न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्धची टी20 मालिका 4-1ने जिंकली. या विजयात जेकब डफीने उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. त्याने मालिकेत 13 बळी घेतले. या कामगिरीचा त्याला जबरदस्त फायदा झाला. कोणत्याही फॉरमॅटमध्ये नंबर 1 रँकिंग मिळवण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे. तर 2018 मध्ये ईश सोधीनंतर तो टी20 रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवणारा न्यूझीलंडचा पहिला गोलंदाज बनला आहे.
फलंदाजी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड अव्वल स्थानावर आहे तर इंग्लंडचा फिल साल्ट तिसऱ्या स्थानावर आहे. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव हे दोन अन्य भारतीय फलंदाज अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.