दुबई : भारतीय महिला क्रिकेट संघासाठी एक आनंदाची आणि एक किंचित निराशेची बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत भारताची स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने (Deepti Sharma) इतिहास रचत टी-२० गोलंदाजीमध्ये जगातील नंबर-१ स्थान पटकावले आहे. मात्र, दुसरीकडे फलंदाजीमध्ये भारताची 'क्वीन' स्मृती मानधनाला (Smriti Mandhana) आपले अव्वल स्थान गमवावे लागले आहे.
भारताची फिरकीपटू दीप्ती शर्मा आता जगातील सर्वोत्तम टी-२० गोलंदाज बनली आहे. दीप्तीने आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच हे शिखर सर केले आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यात विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात दीप्तीने चमकदार कामगिरी केली. तिने आपल्या ४ षटकांच्या कोट्यात केवळ २० धावा देत १ बळी घेतला.
या कामगिरीच्या जोरावर तिने ऑस्ट्रेलियाच्या ऍनाबेल सदरलँड हिला मागे सारले आहे. सदरलँड ऑगस्ट महिन्यापासून या स्थानावर होती, पण आता दीप्तीकडे तिच्यापेक्षा १ रेटिंग पॉईंटची आघाडी आहे. पाकिस्तानची सादिया इक्बाल आता तिसऱ्या स्थानावर घसरली आहे.
एकीकडे दीप्तीच्या यशाचा जल्लोष सुरू असताना, एकदिवसीय (ODI) फलंदाजीच्या क्रमवारीत भारताला धक्का बसला आहे. भारताची धडाकेबाज फलंदाज स्मृती मानधना आता नंबर-१ वरून दुसऱ्या क्रमांकावर घसरली आहे.
दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट (Laura Wolvaardt) आता जगातील नंबर-१ एकदिवसीय फलंदाज बनली आहे. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत लॉराने सलग दोन शतके ठोकली. तिच्या या तुफानी कामगिरीमुळे तिला कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग मिळाले असून तिने मानधनाला मागे टाकले आहे.