दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केलेल्या ताज्या टी-२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. फलंदाजीच्या क्रमवारीत अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांनी आपली अव्वल स्थाने कायम राखली असून, गोलंदाजी आणि अष्टपैलू खेळाडूंच्या श्रेणीतही भारतीयांचा दबदबा पाहायला मिळत आहे.
टॉप १० टी-२० फलंदाजांच्या यादीत भारताच्या चार फलंदाजांनी स्थान पटकावले आहे. सलामीवीर अभिषेक शर्मा ८७५ रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे, तर इशान किशन (८७१ रेटिंग) दुसऱ्या स्थानावर आहे. या युवा जोडीने जागतिक क्रमवारीत आपला दबदबा कायम राखला आहे. त्यांच्याव्यतिरिक्त तिलक वर्मा सहाव्या आणि भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव सातव्या क्रमांकावर स्थिर आहेत.
विदेशी फलंदाजांमध्ये इंग्लंडचा जोस बटलर आठव्या, तर न्यूझीलंडचा टिम सेफर्ट नवव्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या कोनर एस्टरहुइजेनने आश्चर्यकारक प्रगती करत थेट ३९ व्या स्थानी झेप घेतली आहे; यापूर्वी तो पहिल्या १०० खेळाडूंच्या यादीतही नव्हता.
गोलंदाजांच्या क्रमवारीत अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशीद खान अव्वल स्थानी असला तरी, भारतीय गोलंदाजांनी त्याला तगडे आव्हान दिले आहे. भारताचा मिस्ट्री स्पिनर वरूण चक्रवर्ती दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला असून, अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पाचवे स्थान पटकावले आहे.
अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा पहिल्या क्रमांकावर असून, भारताचा हार्दिक पंड्या दुसऱ्या स्थानावर कायम आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केल्याचा फायदा दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना मिळाला आहे. त्यांच्या वेगवान गोलंदाजांच्या क्रमवारीत मोठी सुधारणा झाली आहे. गेराल्ड कोएत्झी ३६ स्थानांची सुधारणा करत ५२ व्या क्रमांकावर पोहचला आहे. तर ओटनील बार्टमन १० स्थानांच्या प्रगतीसह ५६ व्या आणि जॉर्ज लिंडेने ६२ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज जकारी फाउल्केस देखील ११ स्थानांनी वर सरकत ७० व्या क्रमांकावर पोहोचला आहे.