पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC ODI Rankings : आयसीसीने बुधवारी (दि. 26) एकदिवसीय खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यांनी ताज्या क्रमवारीत प्रत्येकी एका स्थानाचा फायदा घेतला आहे. कोहलीने 743 रेटिंगसह पुन्हा एकदा टॉप-5 मध्ये प्रवेश केला आहे. त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्ध 111 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. या खेळीचा त्याला जबरदस्त फायदा झाला आहे.
एकदिवसीय क्रमवारीत भारताचे वर्चस्व दिसून येत आहे. टॉप-10 फलंदाजांमध्ये चार भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. युवा सलामीवीर शुभमन गिल 817 रेटिंगसह अव्वल स्थानी कायम आहे. कर्णधार रोहित शर्मा (757) तिसऱ्या तर श्रेयस अय्यर (679) नवव्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा बाबर आझम (770) दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा हेनरिक क्लासेन चौथ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल एका स्थानाने घसरून सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. केएल राहुलने दोन स्थानांनी प्रगती केली आहे आणि तो 15 व्या स्थानावर पोहोचला आहे.
न्यूझीलंडचा विल यंग (आठ स्थानांनी प्रगती करत 14 व्या स्थानावर), अष्टपैलू रचिन रवींद्र (18 स्थानांनी प्रगती करत 24 व्या स्थानावर) आणि इंग्लंडचा बेन डकेट (27 स्थानांनी प्रगती करत 17 व्या स्थानावर) यांना शतकांचा फायदा झाला आहे.
श्रीलंकेचा महेश तिक्षणा अव्वल स्थानावर आहे. अफगाणिस्तानचा रशीद खान दुसऱ्या आणि भारताचा कुलदीप यादव तिसऱ्या स्थानावर आहे. टॉप-10 गोलंदाजांमध्ये कुलदीप हा एकमेव भारतीय आहे. दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फिरकी गोलंदाज केशव महाराज एका स्थानाने पुढे सरकला असून तो चौथ्या स्थानावर आला आहे. न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीला दोन स्थानांचा फायदा झाला आहे. तो सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.
ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज अॅडम झांपा (दोन स्थानांनी पुढे जाऊन 10 व्या स्थानावर) टॉप-10 मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाला.
मोहम्मद सिराजला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न खेळण्याचे नुकसान सहन करावे लागले आहे. तो 12 व्या क्रमांकावर घसरला आहे. मोहम्मद शमी एका स्थानाने पुढे सरकून 14 व्या स्थानावर पोहोचला आहे. रवींद्र जडेजा 13 व्या स्थानी आहे.
अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. तर सांघिक क्रमवारीत, टीम इंडिया अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे.