Rohit Sharma file photo
स्पोर्ट्स

Rohit Sharma ODI No.1 : हिटमॅन रोहितचा ICC क्रमवारीत धमाका, 38व्या वर्षी बनला ‘वनडे’चा ‘सम्राट’!

ICC ODI Batting Rankings : ३८ व्या वर्षी विश्वविक्रम, रोहित शर्मा जगातील नंबर १ फलंदाज

रणजित गायकवाड

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच, भारतीय सलामीवीर रोहित शर्माने एक मोठा धमाका केला आहे. 'मुंबईचा राजा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या माजी कर्णधाराने बुधवारी (दि. २९) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केलेल्या ताज्या एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली.

‘वय केवळ एक आकडा आहे’ हे रोहित शर्माने अक्षरशः सिद्ध करून दाखवले आहे. ३८ व्या वर्षी त्याने वनडे क्रिकेटमध्ये जगातील नंबर वन फलंदाज बनून विक्रमाची नोंद केली आहे. विशेष म्हणजे, वनडे क्रमवारीत सर्वात जास्त वयाच्या (३८ वर्ष, १८२ दिवस) फलंदाजाने पहिले स्थान मिळवण्याचा विश्वविक्रम आता हिटमॅनच्या नावावर जमा झाला आहे. विशेष म्हणजे, हिटमॅनने आपल्या कारकिर्दीत प्रथमच ही झेप घेतली आहे.

रोहित शर्माच्या वनडे कारकिर्दीची आकडेवारी

  • २७६ वनडे सामने

  • ११३७० धावा

  • ४९.२२ ची सरासरी

  • ३३ शतके आणि ५९ अर्धशतके

रोहित शर्मा हा वनडे क्रमवारीत नंबर वन स्थान मिळवणारा सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्यानंतरचा पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे.

आकडेवारीची किमया!

रोहित शर्मानेचे सध्याचे रेटिंग ७८१ पर्यंत पोहचले आहे. यापूर्वी त्याचे रेटिंग ७४१ होते. नुकतेच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दोन वनडे सामन्यांमध्ये एक अर्धशतक आणि एक शतक ठोकून त्याने आपल्या खात्यात ३६ रेटिंगची भर पाडली. यासह तो थेट पहिल्या स्थानी पोहचला. या शर्यतीत त्याने आपला संघ सहकारी आणि भारतीय कसोटी तसेच वनडे संघाचा कर्णधार शुभमन गिल याला मागे टाकले. यापूर्वी, २०१९ च्या विश्वचषकादरम्यान रोहितने कारकिर्दीतील सर्वोत्तम ८८२ रेटिंगसह वनडे क्रमवारीत दुसरे स्थान मिळवले होते. त्या विश्वचषकात त्याने विक्रमी पाच शतके ठोकली होती.

दमदार पुनरागमन

सात महिन्यांच्या विश्रांतीनंतर रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये शानदार पुनरागमन केले. अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने १०१ च्या जबरदस्त सरासरीने तीन डावांमध्ये २०२ धावा फटकावल्या. या दमदार प्रदर्शनाच्या जोरावरच रोहितने आयसीसी वनडे फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. सिडनीमध्ये झालेल्या तिसऱ्या वनडेमध्ये रोहितने आपल्या कारकिर्दीतील ३३ वे एकदिवसीय आणि ५० वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकले होते, ज्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाला नऊ विकेट्सनी पराभूत केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT