स्पोर्ट्स

ICC Men's Cricket World Cup | अवघ्या 12 दिवसांत दीड कोटीहून अधिक तिकीट अर्ज दाखल; चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता

ICC Men's Cricket World Cup | 'आयसीसी' पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२७ साठीच्या तिकीट बॅलट सुरू झाल्यापासून अवघ्या १२ दिवसांत जगभरातून दीड कोटीहून अधिक तिकीट अर्ज दाखल झाले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

दुबई : वृत्तसंस्था
'आयसीसी' पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२७ साठीच्या तिकीट बॅलट सुरू झाल्यापासून अवघ्या १२ दिवसांत जगभरातून दीड कोटीहून अधिक तिकीट अर्ज दाखल झाले आहेत. 'आयसीसी'ने दिलेल्या माहितीनुसार, १४२ देशांमधील चाहत्यांनी बॅलट नोंदी पूर्ण केल्या असून, यावरून या १४ व्या विश्वचषकाबद्दल जगभरात किती प्रचंड उत्सुकता आहे, हे अधोरेखित होते.

गेल्या आठवड्यात १० लाखांच्या घरात असलेली अर्जांची संख्या अवघ्या दोन आठवड्यांत तब्बल दीड कोटीच्या पार पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणारी ही स्पर्धा नव्या रचनेसह खेळवली जाणार असून, विश्वचषकाच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आणि भव्य स्पर्धा ठरणार आहे.

तिकीट बॅलट प्रक्रियेत सहभाग पूर्णपणे मोफत असून, नोंदणीच्या वेळी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. एका व्यक्तीला एका सामन्यासाठी केवळ एकच अर्ज करता येईल. मात्र, स्पर्धेतील विविध सामन्यांसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची मुभा असेल. उपलब्ध तिकीटांपेक्षा मागणी जास्त असलेल्या सामन्यांसाठी संगणकीय लॉटरी पद्धतीने तिकीट खरेदीचा अधिकार दिला जाईल. निवड झालेल्या अर्जदारांना तिकीट खरेदीच्या प्रक्रियेची माहिती ई-मेलद्वारे पाठवली जाईल.

SCROLL FOR NEXT