पुढारी ऑनलाईन डेस्क : चॅम्पियन ट्रॉफीमध्ये उद्या (दि. २३) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ब्लॉकबस्टर सामन्याकडे अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधले आहे. हा सामना काेणी जिंकावा, यावर भारताचा माजी क्रिकेटपटू अतुल वासन याने आपले मत व्यक्त केले आहे.(India vs Pakistan match)
भारत आणि पाकिस्तान सामन्याबाबत 'ANI' शी बोलताना अतुल वासन म्हणाला की, "मला वाटतं पाकिस्तानने हा सामना जिंकावा. कारण पाकिस्तानने हा सामना गमावला तर त्यांचे स्पर्धेतील आव्हानच संपुष्टात येईल. यामुळे अत्यंत चुरशीच्या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला तर यापुढील चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा ही अत्यंत रोमांचक होईल. तुम्ही पाकिस्तानला जिंकू दिले नाही तर तुम्ही काय कराल? जर पाकिस्तान जिंकला तरच पुढे स्पर्धा अधिक रोमांचक होणार आहे."
भारतीय संघात शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, अक्षर पटेल असे आठव्या क्रमांकापर्यंत उत्कृष्ट फलंदाज आहेत. रोहितने पाच फिरकीपटू निवडले आहेत. ही टीम दुबईसाठी सर्वोत्तम आहे, असेही वासन याने म्हटलं आहे.
ऋषभ पंतला तुम्ही राखीव म्हणून ठेवलं तर तो झिरोचा झिरो होईल, असा इशारा अतुल वासन यांनी संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला दिला आहे. गौतम गंभीर स्वतःचा संघ निवडत आहे. ऋषभ पंत खेळत नसल्याने मला खूप वाईट वाटते. मला माहित नाही का. काय चालले आहे? पंत हा एक उत्साही खेळाडू आहे, ज्याला इतर संघ घाबरतो. कारण त्यांना माहित आहे की तो स्वतःच्या बळावर सामने जिंकू शकतो. तुम्ही त्याला दीर्घकाळ राखीव खेळाडू म्हणून ठेवलं तर त्याचा आत्मविश्वास कमी होईल. हा खेळाडू काही क्षणातच हिरोपासून शून्यावर जाईल. विरोधी संघ पंतला घाबरतात आणि तो भारतीय संघाच्या पहिल्या इलेव्हनमध्ये खेळला पाहिजे, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली.