स्पोर्ट्स

Virat Kohli On Retirement : विराट कोहलीचे निवृत्तीवरून खळबळजनक विधान, म्हणाला ‘तुम्ही मला पाहू शकणार नाही’ (Video)

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli On Retirement : 'जेव्हा माझा क्रिकेटचा प्रवास संपेल तेव्हा मी निघून जाईन', असे धक्कादायक विधान टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने केले आहे. आरसीबीच्या रॉयल गाला डिनर कार्यक्रमात केलेल्या त्याच्या वक्तव्यानंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांच्या अधिकृत एक्स अकौंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.

आयपीएल 2024 मध्ये विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या हंगामात त्याने आरसीबीसाठी धावांचा पाऊस पाडला आहे. 600 हून अधिक धावा फटकवणारा हा खेळाडू सर्वाधिक धावा करणा-या खेळाडूंच्या यादीत तो टॉपवर आहे. तो पुढील महिन्यात होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा सदस्य असून यावेळी चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. असे असतानाही कोहलीने अचानक निवृत्तीबाबत मोठे विधान का केले? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

विराट कोहली म्हणाला की, 'मला वाटते की एक खेळाडू असल्याने माझ्या कारकिर्दीची एक शेवटची तारीख निश्चितच आहे. त्या खास दिवसानंतर पुढे काय होईल हा विचार करून मी माझे करिअर संपवू इच्छित नाही. माझ्या खेळातली गती कमी जास्त होईल. त्यामुळे मला कोणतेही काम अपूर्ण सोडायचे नाही, ज्याचा मला नंतर पश्चाताप होऊ शकतो. मी असे करणारही नाही याची मला पूर्ण खात्री आहे. जोपर्यंत मी खेळत आहे तोपर्यंत मला माझे सर्वस्व खेळाला द्यायचे आहे. ही माझी प्रेरणा आहे.'

विराट कोहली सतत्यपूर्ण खेळाने दरवर्षी तो अटूट मानले जाणारे विक्रम मोडत आहे. गेल्या वर्षीच्या विश्वचषकात, त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकरला मागे टाकत सर्वाधिक एकदिवसीय शतके (50) करणारा खेळाडू बनला. चालू आयपीएल हंगामात, त्याने सध्या 13 डावांमध्ये 155.16 च्या स्ट्राइक रेटने आणि 66.10 च्या प्रभावी सरासरीने 661 धावा फटकावल्या आहेत. तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. यादरम्यान त्याने पाच अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे.

आरसीबी सध्या 13 सामन्यांतून 12 गुणांसह आयपीएल गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. शनिवारी, 18 मे रोजी बेंगळुरूचा तिस-या क्रमांकावरील चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध महत्त्वाचा सामना होणार आहे. सीएसकेचे 13 सामन्यांत 14 गुण आहेत. प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी, बेंगळुरूला चेन्नईविरुद्ध विजय नोंदवावा लागेल. तसेच नेट रनरेटच्या बाबतीत धोनीच्या संघाला मागे टाकावे लागेल. बेंगळुरूचा नेट रन रेट 0.387 आहे तर चेन्नईचा 0.528 आहे.

SCROLL FOR NEXT