लंडन; वृत्तसंस्था : क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या ऐतिहासिक लॉर्डस् मैदानावर तब्बल 23 वर्षांनंतर प्रथमच नवीन ‘टर्फ’ (मैदानाची हिरवळ) टाकण्यात येणार आहे. या बदलामुळे क्रिकेटप्रेमींना एक अनोखी संधी मिळणार असून, त्यांना या मैदानाच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या जुन्या टर्फचा तुकडा खरेदी करून तो आपल्या घरी लावता येणार आहे.
गेल्या 23 वर्षांत या मैदानावर अनेक अविस्मरणीय क्षण अनुभवले गेले आहेत. यामध्ये 2009 मध्ये इंग्लंड महिला आणि पाकिस्तान पुरुष संघांनी जिंकलेला पहिला वर्ल्ड टी-20 अंतिम सामना, अॅशेस मालिकेतील चुरशीचे सामने, लंडन 2012 ऑलिम्पिकमधील तिरंदाजी स्पर्धा आणि इंग्लंडने जिंकलेले दोन विश्वचषक यांचा समावेश आहे. या सर्व ऐतिहासिक क्षणांची साक्षीदार असलेली ही हिरवळ आता चाहत्यांसाठी उपलब्ध होणार आहे.
क्रिकेट चाहत्यांना या ऐतिहासिक टर्फचा एक तुकडा खरेदी करण्याची संधी मेरीलिबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) दिली आहे. टर्फच्या एका तुकड्यासाठी 50 पाऊंड (सुमारे 5,300 रुपये) मोजावे लागतील. मोठ्या प्रमाणात खरेदीवर सवलत मिळेल, असे ईसीबीने म्हटले आहे. या प्रत्येक तुकड्याचा आकार अंदाजे 1.2 मीटर बाय 0.6 मीटर आकाराचा असेल.
या विक्रीतून मिळणारा सर्व निधी लॉर्डस् मैदानाच्या विकासासाठी वापरला जाईल. तसेच, प्रत्येक विक्रीतील 10 टक्के रक्कम एमसीसी फाऊंडेशनच्या ‘ग्लोबल रेफ्युजी क्रिकेट फंडा’ला दान केली जाईल, जो जगभरातील निर्वासित तरुणांना क्रिकेट खेळण्यासाठी मदत करतो.
या टर्फसाठी प्री-ऑर्डर सुरू झाली असून, मर्यादित संख्येमुळे ती लवकरच संपण्याची शक्यता आहे. ही टर्फ 29 आणि 30 सप्टेंबर 2025 रोजी लॉर्डस् मैदानावरून स्वतः घेऊन जावी लागेल. यासाठी कोणतीही डिलिव्हरी सेवा उपलब्ध नाही. ही टर्फ नैसर्गिक आणि नाशवंत असल्याने ती वेळेवर घेऊन जाणे आणि लवकरात लवकर लावणे आवश्यक आहे, असे ईसीबीने यावेळी म्हटले आहे.