Commonwealth Game 2026 | भारतीय ज्युदोचा सुवर्णदिन; राष्ट्रकुलमध्ये अस्मिता-हर्षने रचला इतिहास 
स्पोर्ट्स

Commonwealth Game 2026 | भारतीय ज्युदोचा सुवर्णदिन; राष्ट्रकुलमध्ये अस्मिता-हर्षने रचला इतिहास

तब्‍बल ३६ वर्षांनी जिंकले गोल्‍ड

पुढारी वृत्तसेवा

ग्लास्गो (वृत्तसंस्‍था) : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शुक्रवारचा दिवस भारतीय ज्युदोसाठी ऐतिहासिक ठरला. अस्मिता डे आणि हर्ष सिंह यांनी अनुक्रमे महिला ४८ किलो आणि पुरुष ६० किलो वजनी गटात सुवर्णपदके जिंकत भारतीय ज्युदोच्या इतिहासात नवे पर्व सुरू केले. राष्ट्रकुल स्पर्धेच्‍या इतिहासात भारताला मिळालेली ही पहिली सुवर्णपदके ठरली. १९९० पासून राष्ट्रकुल स्पर्धेत ज्युदोचा समावेश असला, तरी भारताला तब्बल ३६ वर्षे सुवर्णपदकाची प्रतीक्षा करावी लागली होती. मात्र, अस्मिता आणि हर्ष यांनी एका दिवसात दोन सुवर्णपदके जिंकून ही प्रतीक्षा संपवली. दरम्‍यान, भारताने शुक्रवारी भारताला पुरुषांच्या वेटलिफ्टिंग प्रकारात लवप्रीत सिंगने रौप्‍यपदक जिंकून दिले. त्‍याचे सुवर्ण पदक थोडक्‍यात हुकले. बाळाच्या जन्मानंतर मैदानात पुनरागमन करणार्‍या सीमा कालीरमन हिने महिलांच्या थाळीफेकीत ५८.६५ मीटरचा सर्वोत्तम थ्रो करत कांस्यपदक जिंकले. बॉक्सिंगमध्ये अरुंधती चौधरी, जैस्मिन लांबोरिया, प्रीती पवार आणि अंकुश पंघाल यांनी अंतिम फेरीत प्रवेश करून भारतासाठी किमान रौप्यपदक निश्चित केले. ॲथलेटिक्समध्ये मिश्र ४×४०० मीटर प्रकारात विशाल टी.के., राजेश रमेश, रशदीप कौर आणि नीरू पाठक यांच्या भारतीय रिले संघाने अंतिम फेरीत धडक मारली.

हर्ष सिंहकडून ऑस्ट्रेलियाच्या जोशुआ कॅटस्‌चा धुव्वा

हर्ष सिंहने पुरुषांच्या ६० किलो गटाच्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाच्या जोशुआ कॅट्झचा १०-० (वाझा-अरी) असा एकतर्फी पराभव करत इतिहास रचला. तो राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीय पुरुष ज्युदोपटू ठरला. १९९० मध्‍ये राष्ट्रकुल स्पर्धेत ज्‍युदोचा समावेश होता. मात्र गेल्‍या ३६ वर्षांत भारताला ज्‍युदो सुवर्णपदकाने हुलकावणी दिली होती. मात्र शुक्रवारी अस्मिता आणि हर्ष यांनी एका दिवसात दोन सुवर्णपदके जिंकून ही सुवर्णपदकांचा दुष्‍काळ संपविला. या दुहेरी सुवर्ण यशामुळे आजवर झालेल्‍या राष्ट्रकुल स्पर्धेतील ज्‍युदोमध्‍ये भारताची एकूण पदकसंख्या १३ वर पोहोचली असून त्यात २ सुवर्ण, ५ रौप्य आणि ६ कांस्य पदकांचा समावेश आहे.

अस्मिता डेची ऐतिहासिक कामगिरी

त्रिपुरातील २२ वर्षीय ज्‍युदोपटू अस्मिता डे हिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल अशी कामगिरी करत भारताला ज्‍युदोमधील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. महिलांच्या ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात तिने कॅनडाच्या हायडी क्वाच हिचा २-१ असा पराभव केला. अंतिम लढत अत्यंत चुरशीची झाली. निर्धारित वेळेत दोन्ही खेळाडूंमध्ये तोडगा न निघाल्याने सामना गोल्डन स्कोअरमध्ये गेला. या निर्णायक क्षणी अस्मिताने संयम राखत विजयी गुण मिळवला आणि भारतासाठी ऐतिहासिक सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT