बडोदा : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय (ODI) मालिकेचा थरार सुरू झाला असून, पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांची परीक्षा पाहत एक ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. वडोदरा येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडच्या सलामी जोडीने ११७ धावांची भक्कम भागीदारी करत २७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला.
डेव्हन कॉनवे आणि हेन्री निकोल्स या जोडीने पहिल्या विकेटसाठी ११७ धावांची भागीदारी केली. भारतीय भूमीवर न्यूझीलंडच्या सलामी जोडीने केलेली ही आतापर्यंतची दुसरी सर्वोच्च भागीदारी ठरली आहे. यापूर्वी १९९९ मध्ये राजकोट येथे नाथन ॲस्टल आणि क्रेग स्पीयरमॅन यांनी भारतांविरुद्ध ११५ धावांची सलामी दिली होती. आज कॉनवे आणि निकोल्स यांनी हा २७ वर्षे जुना विक्रम मागे टाकला आहे. न्यूझीलंडसाठी भारतात सर्वोच्च सलामी भागीदारीचा विक्रम अँड्र्यू जोन्स आणि जॉन राईट (१४० धावा, १९८८) यांच्या नावावर आहे.
नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र कॉनवे आणि निकोल्स यांनी भारतीय गोलंदाजांना सुरुवातीला यश मिळू दिले नाही. पहिल्या १० षटकांत न्यूझीलंडने बिनबाद ४९ धावा केल्या होत्या. त्यानंतर पुढच्या १० षटकांत या दोघांनी केवळ धावगतीच वाढवली नाही, तर आपापली अर्धशतके पूर्ण करत संघाला शंभरचा टप्पा ओलांडून दिला.
न्यूझीलंडचे सलामीवीर सर्वकालीन विक्रम मोडतील असे वाटत असतानाच, भारतीय वेगवान गोलंदाज हर्षित राणा भारताच्या मदतीला धावून आला. २२ व्या षटकात हर्षितने हेन्री निकोल्सला (६२ धावा) बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले आणि ही धोकादायक जोडी फोडली.
भारतीय संघ : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
न्यूझीलंड संघ : डेव्हन कॉनवे (यष्टीरक्षक), विल यंग, हेनरी निकोल्स, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल (कर्णधार), जोश क्लार्कसन, क्रिस्टियन क्लार्क, काईल जेमीसन, आदित्य अशोक, मायकल राय.