दक्षिण आफ्रिकेचा स्‍टार फलंदाज हेनरिक क्लासेनने गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून क्रिकेट जगताला धक्का दिला हाेता. File Photo
स्पोर्ट्स

Heinrich Klaasen : आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती का घेतली? क्लासेनने केला धक्कादायक खुलासा

क्रिकेट साउथ आफ्रिकाने प्रशिक्षक बदलाचा मोठा परिणाम

पुढारी वृत्तसेवा

दक्षिण आफ्रिकेचा स्‍टार फलंदाज हेनरिक क्लासेन ( Heinrich Klaasen ) याने गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून क्रिकेट जगताला धक्का दिला. वयाच्‍या अवघ्‍या ३३ व्‍या वर्षी त्‍याने एवढा मोठा निर्णय कोणत्‍या कारणास्‍तव घेतला याची माहिती दिली नव्‍हती; पण त्‍याने आपल्‍या निवृत्तीच्‍या निर्णयाबाबत धक्‍कादायक खुलासा केला आहे.

२०२७ विश्वचषकापर्यंत द. आफ्रिकेकडून खेळण्‍याची इच्‍छा होती, पण...

हेनरिक क्लासेन म्हणाले की, मला देशासाठी क्रिकेट खेळण्यासोबतच जगभरातील मोठ्या टी-२० लीगमध्ये खेळायचे होते, परंतु क्रिकेट साउथ आफ्रिका (CSA) सोबत करार होऊ शकला नाही. तसेच प्रशिक्षणातही करण्‍यात आलेल्‍या बदलामुळे त्याला हा निर्णय घ्यावा लागला. क्लासेनला २०२७ च्या क्रिकेट विश्वचषकापर्यंत दक्षिण आफ्रिकेकडून खेळण्‍याची इच्‍छा होती; परंतु रॉब वॉल्टर प्रशिक्षकपदावरून पायउतार झाले. दक्षिण आफ्रिका वन-डे संघासाठी शुक्री कॉनराड यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली. त्‍यामुळे क्लासेनच्या भविष्याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली.

दक्षिण आफ्रिकेकडून खेळण्याचा खरोखर आनंद मिळत नव्हता

क्लासेन या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिका संघात होता, परंतु त्यानंतर क्रिकेट साउथ आफ्रिका (CSA) ने त्याला केंद्रीय करारासाठी दुर्लक्षित केले. निवृत्तीच्या निर्णयाबद्दल बोलताना क्लासेनने खुलासा केला की, " मी खरोखरच वाईट परिस्थितीत होताे. मला दक्षिण आफ्रिकेकडून खेळण्याचा खरोखर आनंद मिळत नव्हता. मला बऱ्याच काळापासून असे वाटत होते की मला माझ्या कोणत्याही कामगिरीची आणि संघ जिंकतो की नाही याची खरोखर पर्वा नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी मी रॉबसोबत बराच वेळ चर्चा केली. त्याला सांगितले की जे चालले आहे त्याबद्दल मला चांगले वाटत नाही. मला ते फारसे आवडत नव्हते."

हेनरिक क्लासेनचे 'सीएसए'शी पटले नाही

रिपोर्टनुसार, हेनरिक क्लासेन म्हणाले की, बऱ्याच काळापासून त्यांना असे वाटत होते की, आपल्‍या कामगिरीचा संघावर फारसा फरक पडत नाही, मग संघ जिंको किंवा हरो. अशा ठिकाणी राहणे योग्य नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी त्यांनी रॉबशी दीर्घकाळ चर्चा केली होती. २०२७ मध्ये होणाऱ्या विश्वचषकापर्यंत सर्व काही व्यवस्थित नियोजन केले होते. रॉब यांनी प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपवला आणि सीएसएसोबतचा करार यशस्वी झाला नाही, तेव्हा त्यांच्यासाठी हा निर्णय घेणे आणखी सोपे झाले, असेही क्‍लासेन याने स्‍पष्‍ट केले आहे.

आता कुटुंबासाठी वेळ देणार

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर क्लासेनने त्याच्या कुटुंबासोबत वेळ व्‍यतित करण्‍याची इच्छा व्यक्त केली आहे. आता मी सहा-सात महिने घरी राहू शकतो. माझ्या कुटुंबाला त्याची गरज आहे, चार वर्षे झाली आहेत आणि खूप प्रवास करावा लागला आहे. मला थोडी विश्रांती हवी आहे,"असेही त्‍याने स्‍पष्‍ट केले आहे.

जगभरातील टी-२० लीगमध्ये खेळणार

क्लासेन याने २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्‍याने दक्षिण आफ्रिकेसाठी चार कसोटी, ६० एकदिवसीय आणि ५८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. कसोटीत १०४ धावा, एकदिवसीय सामन्यात २१४१ धावा आणि टी-२० मध्ये १००० धावा त्‍याच्‍या नावावर आहेत. आता यापुढे जगभरातील टी-२० लीगमध्ये खेळताना दिसेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT