बांगलादेशविरुद्धच्या टी20 सामन्यात अर्शदीपशिवाय आणखी एका वेगवान गोलंदाजाच्या निवडीबाबत सातत्याने चर्चा होत आहे. File Photo
स्पोर्ट्स

हर्षित राणा की मयंक यादव.. पहिल्या टी-20 साठी अर्शदीप सिंगचा जोडीदार कोण असेल?

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : India vs Bangladesh T20 : भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेची चाहत्यांना उत्सुकता लागलेली आहे. 6 ऑक्टोबरपासून ही मालिका सुरू होणार आहे. बीसीसीआयने जसप्रीत बुमराहसह अनेक मोठ्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. या काळात बुमराहच्या अनुपस्थितीत अर्शदीप सिंग भारतीय वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करताना दिसणार आहे. मात्र, अर्शदीपशिवाय आणखी एका वेगवान गोलंदाजाच्या निवडीबाबत सातत्याने चर्चा होत आहे. संघात अनेक वेगवान अष्टपैलू खेळाडूही आहेत. या कारणास्तव केवळ दोन विशेषज्ञ वेगवान गोलंदाजांना संधी मिळू शकते. मात्र, अंतिम निर्णय प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यावर अवलंबून आहे.

दोन अनकॅप्ड गोलंदाज

अर्शदीप व्यतिरिक्त, मयंक यादव आणि हर्षित राणा या दोन अनकॅप्ड गोलंदाजांची बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. दोन्ही गोलंदाजांना पदार्पणाची संधी मिळाल्यास ही मालिका त्यांच्यासाठी संस्मरणीय ठरू शकते. मात्र, ग्वाल्हेरच्या मैदानावर कोणाला पसंती दिली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हर्षितचे पारडे जड

मयंक यादवने त्याच्या टी-20 कारकिर्दीत केवळ 14 सामने खेळले आहेत, तर हर्षितला 25 टी-20 सामन्यांचा अनुभव आहे. हर्षित नियमितपणे क्रिकेट खेळत आहे आणि नुकताच तो दुलीप ट्रॉफी दरम्यान इंडिया डी कडून खेळताना दिसला. या काळात हर्षितने दोन सामन्यांत एकूण 8 बळी घेतले. त्याच वेळी, मयंक यादव आयपीएल 2024 मध्ये पदार्पण करताना अवघ्या 4 सामन्यांनंतर जखमी झाला आणि तेव्हापासून तो मैदानाबाहेर आहे.

हर्षित राणा आणि मयंक यादव यांची कारकीर्द

हर्षित राणाने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत आतापर्यंत 9 फर्स्ट क्लास, 14 लिस्ट ए आणि 25 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने एकूण 86 विकेट घेतल्या आहेत. तर, आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळताना हर्षित राणाने 21 सामन्यांत एकूण 25 विकेट घेतल्या आहेत.

मयंक यादवने आयपीएल 2024 दरम्यान लखनऊ सुपर जायंट्ससाठी पदार्पण केले. त्याने आपल्या वेगवान गतीने सर्वांना प्रभावित केले. मयंकने आपल्या करिअरमध्ये 1 फर्स्ट क्लास, 17 लिस्ट ए आणि 14 टी-20 सामने खेळले असून यात एकूण 55 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर मयंकच्या नावावर आयपीएलमध्ये 4 सामन्यांत 7 विकेट्स आहेत.

टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, रियन पराग, नितीश रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT