ॲटलांटा; वृत्तसंस्था : फिफा विश्वचषक स्पर्धेतील अटीतटीच्या बाद फेरीच्या सामन्यात इंग्लंडने डीआर काँगोचा २-१ ने पराभव करत दिमाखात उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अटलांटा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कर्णधार हॅरी केनने अवघ्या ११ मिनिटांत दोन गोल करून इंग्लंडला थरारक विजय मिळवून दिला.
पूर्वार्धात ७ व्या मिनिटालाच डीआर काँगोच्या ब्रायन सिपेन्गाने मैदानावर खळबळ उडवून दिली. इंग्लंडची बचावात्मक चूक हेरून सिपेन्गाने गोलपोस्टच्या अगदी जवळून एक सणसणीत लो-शॉट मारत गोलरक्षक जॉर्डन पिकफोर्डला चकवले आणि काँगोला १-० अशी अनपेक्षित आघाडी मिळवून दिली. या धक्क्यानंतर इंग्लंडने आक्रमणाची धार वाढवली. ज्युड बेलिंगहॅम आणि नोनी माडुएके यांनी गोल करण्याचे उत्तम प्रयत्न केले, मात्र काँगोचा गोलरक्षक लायोनेल म्पासी भिंतीसारखा उभा राहिला. पुढे दुसऱ्या हाफमध्येही तब्बल ७० मिनिटांपर्यंत काँगोने इंग्लंडला रोखून धरले होते. सामन्यात केवळ १५ मिनिटे शिल्लक असताना, बदली खेळाडू अँथनी गॉर्डनने डाव्या बाजूने बॉक्समध्ये एक उत्कृष्ट क्रॉस टाकला. तिथे योग्य ठिकाणी उपस्थित असलेल्या हॅरी केनने शानदार हेडर मारून चेंडू गोलपोस्टमध्ये धाडला आणि इंग्लंडला १-१ अशी अत्यंत महत्त्वाची बरोबरी साधून दिली.
पहिल्या गोलनंतर अवघ्या ११ मिनिटांनी हॅरी केनने पुन्हा एकदा आपली जादू दाखवली. काँगोच्या डी-बॉक्सच्या काठावर डिफेंडर्सनी त्याला घेरलेले असतानाही, ज्युड बेलिंगहॅम आणि गॉर्डनच्या पासवर केनने अप्रतिम गतीने वळत गोलपोस्टच्या उजव्या कोपऱ्यात एक रॉकेट शॉट मारला. म्पासीकडे हा शॉट रोखण्यासाठी कोणतीही संधी नव्हती. या दुसऱ्या गोलसह इंग्लंडने २-१ अशी विजयी आघाडी घेतली. हाच गोलफरक शेवटपर्यंत कायम राहिला.
या दोन गोलसह हॅरी केनने आंतरराष्ट्रीय मोठ्या स्पर्धांमध्ये (विश्वचषक आणि युरो कप) इंग्लंडसाठी एकूण १९ गोल पूर्ण केले आहेत. युरोपियन पुरुष फुटबॉलपटूंमध्ये आता केवळ ख्रिस्तियानो रोनाल्डो (२४ गोल) त्याच्या पुढे आहे.
या रोमहर्षक विजयानंतर इंग्लंडचा संघ आता ‘राऊंड ऑफ १६’मध्ये पोहोचला असून, त्यांचा सामना सहयजमान मेक्सिकोविरुद्ध ऐतिहासिक एस्टाडिओ अझ्टेका मैदानावर होणार आहे.
हॅरी केनने ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचा विश्वचषकातील १२ गोलांचा ऐतिहासिक विक्रम येथे मागे टाकला. केनचे आता विश्वचषकात एकूण १३ गोल्स झाले आहेत. केनने यापूर्वी गॅरी लिनेकरचा इंग्लंडतर्फे सर्वाधिक १० गोलचा विक्रमही मागे टाकला होता.