पुढारी ऑनलाईन डेस्क : England Team New Captain : इंग्लंड क्रिकेट संघाला वनडे आणि टी20 फॉरमॅटसाठी नवा कर्णधार मिळाला आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड म्हणजेच ईसीबीने या निर्णयाची घोषणा सोमवारी (दि. 7) केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्यंत जोस बटलर इंग्लंडच्या व्हाइट बॉल संघाचा कर्णधार होता, परंतु संघाच्या सातत्याने होत असलेल्या खराब कामगिरीमुळे त्याला कर्णधारपद सोडावे लागले. आता ईसीबीने हॅरी ब्रूक याची मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.
ईसीबीने निवेदन जारी करून म्हटले आहे की, ‘हॅरी ब्रूक इंग्लंडच्या व्हाईट बॉल संघाचा नवीन कर्णधार असेल. गेल्या महिन्यात पाकिस्तानमध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधून इंग्लिश संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. संघ साखळी फेरीतून बाहेर पडला. या खराब कामगिरीनंतर जोस बटलर व्हाइट बॉल संघाच्या कर्णधार पदावरून पायउतार झाला. त्याचा राजीनामा बोर्डाने स्विकारला असून आता त्याच्या जागी ब्रूक संघाचे नेतृत्व करेल.
26 वर्षीय ब्रूकने 2022 मध्ये पदार्पण केले होते, तेव्हापासून सातत्याने खेळत आहे. तो इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघात एक महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याला सर्व फॉरमॅटमध्ये देशातील सर्वात प्रतिभावान फलंदाजांपैकी एक मानले जाते. ब्रूक सध्या आयसीसी कसोटी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. याआधी, तो एकदिवसीय आणि टी-20 मध्ये जोस बटलरच्या नेतृत्वाखाली उपकर्णधार म्हणून काम करत होता.
ब्रूकसाठी कर्णधारपदाची जबाबदारी नवीन नसेल कारण त्याने यापूर्वी इंग्लंडच्या 19 वर्षांखालील संघाचे नेतृत्व केले आहे. 2008 मध्ये, जेव्हा न्यूझीलंडमध्ये 19 वर्षांखालील विश्वचषक आयोजित करण्यात आला होता, तेव्हा तो इंग्लंडचा कर्णधार होता.
ब्रुकही आयपीएलमध्ये खेळणार होता. दिल्ली कॅपिटल्सने त्याला आपल्या संघात समाविष्ट केले होते, परंतु स्पर्धा सुरू होण्यापूर्वी त्याने खेळण्यास नकार दिला. यासाठी त्याने वैयक्तिक कारणे दिली होती. यानंतर, नवीन नियमांनुसार, बीसीसीआयने त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली असून तो पुढील दोन वर्षे आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही.
ब्रूकने आतापर्यंत इंग्लंडसाठी 26 एकदिवसीय सामन्यांमध्ये 34च्या सरासरीने 816 धावा केल्या आहेत. यादरम्यान, त्याने एक शतक आणि 5 अर्धशतके झळकावली आहेत. त्याने टी-20मध्येही चमकदार प्रदर्शन 44 सामन्यांत 798 धावा फटकावल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 4 अर्धशतके आहेत. ब्रूकची प्रतिभा कसोटी क्रिकेटमध्येही दिसून येते. आतापर्यंत त्याने 24 कसोटी सामने खेळून 2281 धावा केल्या आहेत. यात त्याच्या नावावर आठ शतके आणि 10 अर्धशतके आहेत. त्याने पाकिस्तानमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतकही झळकावले आहे.