दुबई; वृत्तसंस्था : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ याला गत रविवारी भारताविरुद्धच्या आशिया चषक सुपर फोर सामन्यादरम्यान केलेल्या असभ्य आणि आक्षेपार्ह वर्तनाबद्दल त्याच्या सामना शुल्कातून 30 टक्के दंड ठोठावण्यात आला. याच सामन्यात अर्धशतक पूर्ण केल्यानंतर ‘बंदुकीच्या गोळीबार’ची आगळीक करणारा त्याचा संघ सहकारी साहिबजादा फरहानला मात्र कोणताही दंड न आकारता केवळ ताकीद देऊन सोडण्यात आले आहे.
सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी शुक्रवारी दुपारी सुनावणी पूर्ण केली. या कारवाईची माहिती सूत्राने गोपनियतेच्या अटीवर दिली. यापूर्वी, भारतविरुद्धच्या सामन्यात कथित चिथावणीखोर कृत्यांबद्दल हजर राहण्याची सूचना रौफ आणि फरहान यांना करण्यात आली होती. ते हजर राहिले. मात्र, सुनावणीत त्यांनी ‘आयसीसी’च्या सुनावणीदरम्यान आपण दोषी नसल्याचा दावा केला होता.
रिचर्डसन यांनी पाकिस्तान संघाच्या हॉटेलमध्ये ही सुनावणी घेतली. दोन्ही खेळाडू त्यांच्यासमोर व्यक्तिशः उपस्थित राहिले. शिवाय, त्यांची उत्तरे लेखी स्वरूपात देण्यात आली होती. यावेळी त्यांच्यासोबत संघाचे व्यवस्थापक नवीद चीमा उपस्थित होते.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआयने) बुधवारी केलेल्या औपचारिक तक्रारीत या दोघांवर चिथावणीखोर हावभाव केल्याचा आरोप ठेवला होता. रौफने स्टँडस्मधील भारतीय चाहत्यांना ‘विमान कोसळल्याचा’ हावभाव करून त्यांची खिल्ली उडवली होती, तर फरहानने अर्धशतकानंतर केलेली कृतीही आक्षेपार्ह ठरली. हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ रविवारी होणार्या प्रादेशिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत.
आशिया चषकात 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध सामन्यात आयसीसी आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल सूर्यकुमार यादवला त्याच्या सामना शुल्काच्या 30 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. पाकिस्तानविरुद्ध दणदणीत विजय मिळवल्यानंतर सूर्यकुमारने पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांप्रती सहानुभूती व्यक्त केली होती. तसेच, ‘ऑपरेशन सिंदूर’साठी भारतीय लष्कराचे कौतुक केले होते. सूर्यकुमारच्या टिपणीबद्दल पीसीबीने अधिकृत तक्रार दाखल केली होती, त्यानंतर ‘आयसीसी’ने ही कारवाई केली आहे.