Hardik Pandya 
स्पोर्ट्स

Hardik Pandya : गुजरातने रिटेन करूनही हार्दिक मुंबईकडे कसा?

Arun Patil

मुंबई, वृत्तसंस्था : हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) गुजरात टायटन्सची साथ सोडत त्याच्या जुन्या मुंबई इंडियन्स संघात घरवापसी केली आहे. नाट्यमय घडामोडींनंतर तो कॅश ट्रेड डीलच्या माध्यमातून गुजरातमधून मुंबई संघात परतला आहे.

चार महिन्यांपूर्वी मुंबई इंडियन्सचा एक 'दूत' गुजरात टायटन्सच्या कॅम्पमध्ये गेला होता. त्यावेळी त्याने हार्दिक पंड्याला आयपीएलमध्ये सोबत घेण्याबाबत चर्चा केली होती. खुद्द हार्दिकही याबद्दल खूप उत्सुक असल्याचे बोलले गेले. यानंतर गुजरात टायटन्स फ्रँचायझीने काही अटींसह हार्दिकला निरोप देण्यावर सहमती दर्शवली. यानंतर मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पंड्या यांच्यात पेपर वर्क सुरू झाले. मात्र हे काम रिटेंशनच्या शेवटच्या वेळेपर्यंत चालू राहिले. अखेर रविवारी (दि. 26) सायंकाळी या डीलवर शिक्कामोर्तब झाला आणि पंड्याचे मुंबई इंडियन्समध्ये 'हार्दिक स्वागत' झाले. मग प्रश्न असा पडतो की, हार्दिकचे एमआयमध्ये येणे निश्चित होते तर मग गुजरात टायटन्सने रिटेंशनच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याचे नाव आपल्या यादीत कायम का ठेवले? त्याचा उल्लेख गुजरातचा कर्णधार असा का केला?

वास्तविक, मुंबई इंडियन्सला हार्दिक पंड्याचा कॅश ट्रेड डीलचा पर्याय वापरून त्याचा आपल्या संघात समावेश करायचा होता. पण फ्रँचायझीकडे ही डील पूर्ण करण्यासाठीची पुरेशी रक्कम नव्हती. अशा स्थितीत हार्दिकसाठी एका बड्या खेळाडूचा 'बळी' देण्याचा निर्णय मुंबईने घेतला. यात ऑस्ट्रेलियाचा युवा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनची निवड करण्यात आली. ग्रीनला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला 'ऑल कॅश' डीलच्या माध्यमातून देण्यात आले. त्यानंतर एमआय फ्रँचायझीकडे गुजरात टायटन्ससोबत सर्व रोख करार करण्यासाठीची रक्कम जमा झाली. गेल्या लिलावात ग्रीनला मुंबई इंडियन्सने 17.5 कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्यामुळे त्याची डील फायनल होईपर्यंत मुंबई इंडियन्सकडे हार्दिकला खरेदी करण्यासाठी लागणारी रक्कम त्यांच्या खात्यात नव्हती. त्यामुळे औपचारिक कागदपत्रे पूर्ण झाली नसल्याने आयपीएल आणि बीसीसीआयने 'ट्रान्सफर'च्या या प्रक्रियेला मान्यता देण्यापासून रोखले.

सायंकाळी पाचनंतर हार्दिकचा 'ट्रेड ऑफ' पूर्ण झाला. आता हा करार अधिकृत झाला असून तो मुंबई इंडियन्सचा खेळाडू बनला. 2025 मध्ये 'मेगा ऑक्शन' होणार असून प्रत्येक फ्रँचायझी युवा खेळाडूंसह नवीन संघ तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्सने त्यांच्या भविष्यातील योजना लक्षात घेऊन पंड्याला आपल्या संघाचा भाग बनवले आहे.

गुजरात टायटन्सकडून 'हार्दिक' शुभेच्छा (Hardik Pandya)

अहमदाबाद : क्रिकेट वर्तुळात मागील दोन दिवसांपासून चर्चेचा केंद्रबिंदू असलेला हार्दिक पंड्या आता अधिकृतरीत्या मुंबई इंडियन्सच्या संघाचा सदस्य झाला. पंड्याने आपल्या संघात घरवापसी केली असून आयपीएल 2024 मध्ये तो मुंबईच्या ताफ्यात दिसणार आहे. गुजरातच्या फ्रँचायझीचे डायरेक्टर विक्रम सोलंकी यांनी पडद्यामागील बाबी सांगून चर्चेला पूर्णविराम दिला. हार्दिक पंड्याला त्याच्या घरच्या संघात जायचे होते. त्याचीच इच्छा असल्यामुळे त्याला मुंबईच्या संघात पाठवले गेले, असे सोलंकी यांनी स्पष्ट केले. विक्रम सोलंकी म्हणाले, गुजरात टायटन्सचा पहिला कर्णधार म्हणून हार्दिकने अप्रतिम कामगिरी केली. त्याच्या या निर्णयाचा आम्हाला आदर असून आम्ही त्याला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT