पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग 'आयपीएल'च्या यंदाच्या हंगामासाठी लिलाव सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात सुरु झाला आहे. आजपासून (दि. २४) हा लिलाव दोन दिवस चालणार आहे. या लिलावात 10 संघ निश्चित होणार आहेत. आजच्या लिलावात भारतीय खेळाडूंचा बोलबाला राहिला. श्रेयस अय्यरला पंजाबने २६.७५ कोटी रुपयांना खरेदी केले. यानंतर टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत याने काही मिनिटांमध्ये श्रेयस अय्यरला पिछाडीवर टाकत आयपीएलमधील आजवरचा सर्वात महागडा खेळाडू म्हणून आपल्या नावाची नोंद केली. लखनौ संघाने ऋषभ पंतला २७ कोटींना खरेदी केले. तर पंजाब किंग्ज संघाने चहलसाठी १८ कोटींची बोली लावली. चहल हा आयपीएल लिलावातील आजवरचा सर्वात महागडा भारतीय फिरकी गोलंदाज ठरला आहे.
माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यने ट्विट केले, "माझा चॅम्पियन भाऊ युजवेंद्र चहलसाठी 18 कोटी. पंजाबमध्ये आपले स्वागत आहे. पाहा कांगारुही आता तुझी कॉपी करु लागले आहेत." या पोस्टला त्याने युजवेंद्र चहल याचा स्टेडियमच्या सीमारेषेबाहेर निवांत पहुडलेला फोटो शेअर केला आहे.
टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत याने आयपीएलच्या लिलावातील बोलीत नवा विक्रम प्रस्थापित केला. आजच्या लिलावात त्याने काही मिनिटांमध्ये श्रेयस अय्यरला पिछाडीवर टाकत आयपीएलमधील आजवरचा सर्वात महागडा खेळाडू म्हणून आपल्या नावाची नोंद केली. लखनौ संघाने ऋषभ पंतला २७ कोटींना खरेदी केले आहे. श्रेयस अय्यरला 26.75 कोटी रुपयांची बोली लागली होती. ऋषभ पंतसाठी लखनौ आणि आरसीबी यांच्यात रस्सीखेच सुरु होती. पंत 2 कोटींच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता. अल्पावधीतच त्याची किंमत 10 कोटींच्या पुढे गेली. ऋषभ पंतला आपल्या संघात सहभागी करुन घेण्यासाठी हैदराबादही शर्यतीत सामील झाले; पण लखनौ शर्यतीमध्ये राहिले. हैदराबादचे मालक काव्या मारन आणि लखनऊचे मालक संजय गोयंका यांनी पंतसाठी लिलावाच्या टेबलावर बोली लावली आणि काही वेळातच त्याची किंमत १७ कोटींच्या पुढे गेली. लखनौने पंतसाठी 20.75 कोटी रुपयांची बोली लावली आणि हैदराबादने माघार घेतली. मात्र, दिल्लीने आरटीएमचा वापर केला. यानंतर लखनौने पंतसाठी २७ कोटींची ऑफर दिली आणि दिल्लीने माघार घेतली. अखेर लखनौने २७ कोटी रुपयांना ऋषभ पंतला आपल्या संघात घेतले.
श्रेयस अय्यर, ज्याने KKR ला त्याच्या नेतृत्वाखाली IPL 2024 चे विजेतेपद मिळवून दिले होते. तो आयपीएलच्या इतिहासातील लिलावात सर्वाधिक कमाई करणारा दुसरा खेळाडू बनला. पंजाबने श्रेयसला २६.७५ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. श्रेयसची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. श्रेयस अय्यरला मिळविण्यासाठी सुरुवातीला दिल्ली आणि कोलकाता यांच्यात जोरदार स्पर्धा पाहण्यास मिळाली. या दोघांमध्ये पंजाब किंग्जनेही बोलीत उडी घेतली. यानंतर पंजाब आणि दिल्ली यांच्यात श्रेयस आणि केकेआरला मागे घेण्याची स्पर्धा लागली. श्रेयस लिलावात विकला गेलेला सर्वात महागडा भारतीय खेळाडू तसेच आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. आहे अय्यरने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा विक्रम मोडला, ज्याला कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटी रुपयांना अखेर विकत घेतले होते.
टी-२० क्रिकेटमध्ये ९६ विकेटपर्यंत मजल मारलेल्या अर्शदीप सिंगसाठी मोठी बोली लागली. पंजाब किंग्सने राईट टू मॅच (आरटीएम) कार्ड वापरून वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला 18 कोटी रुपयांना खरेदी केले. अर्शदीपवरची बोली चेन्नई सुपर किंग्जने सुरू केली होती. त्याला मिळवण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये काही वेळ रस्सीखेच होती. राजस्थान आणि गुजरातनेही बोलीत उडी घेतली, पण अखेर सनरायझर्स हैदराबादने १५.७५ कोटींची बोली लावली. हैदराबादची बोली लागताच पंजाबला अर्शदीपसाठी आरटीएम वापरण्याबाबत विचारण्यात आले. पंजाबने आरटीएम कार्ड वापरुन हैदराबादने 18 कोटी रुपयांची ऑफर दिली ज्यासाठी पंजाबने ग्रीन सिग्नल दाखवला.
ऋषभ पंत (२७) लखनौ सुपरजायंट्स, श्रेयस अय्यर (२६.७५) पंजाब किंग्ज, अर्शदीप सिंग (१८) पंजाब किंग्स, युझवेंद्र चहल (१८) पंजाब किंग्ज, जोस बटलर १५.७५ गुजरात टायटन्स
ऋषभ पंत, संघ- लखनौ सुपरजायंट्स (२७)
श्रेयस अय्यर, संघ- पंजाब किंग्ज (२६.७५)
मिचेल स्टार्क, संघ- कोलकाता नाइट रायडर्स (२४.७५) वर्ष २०२४
पॅट कमिन्स, संघ- सनरायझर्स हैदराबाद (२०.५०)२०२४
सॅम करन, संघ-पंजाब किंग्स- (१८.५०) वर्ष २०२३
कॅमेरून ग्रीन, संघ- मुंबई इंडियन्स (१७.५०) वर्ष २०२३