स्पोर्ट्स

‘काळी टॅक्सी’.. इंग्लंडच्या आर्चरवर वर्णद्वेषी टिप्पणी, हरभजन सिंगवर गंभीर आरोप

IPL 2025 : भारतीय खेळाडूला IPL मध्ये बॅन करण्याची मागणी

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल सुरू होऊन अवघे दोन दिवस झाले असतानाच स्पर्धेदरम्यान मोठा वाद निर्माण झाला आहे. भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग आपल्या समालोचनामुळे चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. खरं तर, सोशल मीडियावर हरभजन सिंग यांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याचा आहे, ज्यामध्ये त्याने एक अशी टिप्पणी केली आहे, ज्यामुळे खळबळ उडाली आहे. चाहते त्यांच्यावर वर्णद्वेषी टिप्पणी केल्याचा आरोप करत आहेत.

रविवारी आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा 44 धावांनी पराभव केला. या सामन्यादरम्यान वांशिक टिप्पणी केल्याबद्दल माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगवर टीका होत आहे. खरंतर, हे प्रकरण इंग्लंडच्या वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरशी संबंधित आहे, ज्याला हरभजनने ‘काळी टॅक्सी’ असे संबोधले होते. या प्रकारच्या कमेंटमुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला असून हरभजन ट्रोल होत आहे.

खरं तर, सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ राजस्थान रॉयल्सच्या डावाच्या 18व्या षटकातील आहे. त्या वेळी ईशान किशन आणि हेनरिक क्लासेन फलंदाजी करत होते, तर जोफ्रा आर्चर गोलंदाजी करत होता. याच दरम्यान, जेव्हा क्लासेनने आर्चरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर सलग चौकार मारले, तेव्हा हरभजन सिंग म्हणाला, ‘लंडनमध्ये काळ्या टॅक्सीचे मीटर वेगाने फिरते आणि इथे आर्चरचे मीटर वेगाने फिरत आहे.’

हरभजनची ही टिप्पणी जोरदार व्हायरल झाली असून, चाहते त्याच्यावर संताप व्यक्त करत आहेत. अनेकांनी त्याला समालोचनातून बॅन करण्याची मागणी केली आहे. मात्र, हरभजनने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही किंवा माफी मागितलेली नाही.

आर्चरची तुलना ‘काळ्या टॅक्सी’शी केली, जी एक वर्णद्वेषी टिप्पणी असल्याचा आरोप चाहत्यांनी केला आहे. एका युजरने लिहिले की, ‘हरभजन सिंगने हिंदी कॉमेंट्रीमध्ये जोफ्रा आर्चरला काळी टॅक्सी म्हटले. ही खूप वाईट गोष्ट आहे. कृपया त्यांच्यावर बंदी घाला.’ दरम्यान, एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘वर्णभेद शिगेला पोहोचला आहे, हरभजनने आर्चरला काळी टॅक्सी म्हण इंग्लिश खेळाडूचा अपमान केला आहे.’

आर्चरची खराब कामगिरी

या सामन्यात जोफ्रा आर्चरने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा स्पेल टाकला. त्याने 4 षटकांत 76 धावा दिल्या. त्याच्या पहिल्याच षटकात 23 धावा कुटल्या गेल्या. यानंतर, आर्चरने दुसऱ्या षटकात 12, तिसऱ्या षटकात 22 आणि चौथ्या षटकात 19 धावा देऊन हा लाजिरवाणा विक्रम आपल्या नावावर केला. आर्चरच्या आधी, मोहित शर्मा हा सर्वात महागडा स्पेल टाकणारा गोलंदाज होता. गेल्या हंगामात त्याने एका सामन्यात 73 धावा दिल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT