कैरो; वृत्तसंस्था : येथे आयोजित ऑलिम्पिक नेमबाजी रेंजमध्ये पुरुषांच्या 25 मीटर सेंटर फायर पिस्तूल स्पर्धेत ऑलिम्पियन गुरप्रीत सिंगला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. गुरप्रीतला युक्रेनच्या पावलो कोरोस्टिलॉव्हकडून पराभव पत्करावा लागला. विश्वचषक स्पर्धेतील गुरप्रीतचे हे दुसरे वैयक्तिक पदक आहे. यापूर्वी, 2018 मध्ये चांगवान येथे गुरप्रीतने 25 मीटर स्टँडर्ड पिस्तूल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. फ्रान्सच्या यान पिएर लुईस फ्रिड्रीचीने कांस्यपदकावर मोहोर उमटवली.
या स्पर्धेत भारताने एकूण 13 पदकांसह (3 सुवर्ण, 6 रौप्य आणि 4 कांस्य) तिसरा क्रमांक प्राप्त करत मोहिमेची सांगता केली. चीनने 12 सुवर्ण, 7 रौप्य आणि 2 कांस्यपदकांसह अव्वल स्थान पटकावले. दक्षिण कोरियाने 7 सुवर्ण, 3 रौप्य आणि 4 कांस्यपदकांसह एकूण पदकतालिकेत दुसरे स्थान मिळवले. दोन दिवसांच्या ‘प्रिसिजन’ आणि ‘रॅपिड’ टप्प्यांच्या स्पर्धेत गुरप्रीतने एकूण 584-18 गुण नोंदवले, तर कोरोस्टिलॉव्हने 29 ‘इनर 10’ गुण आणि अंतिम रॅपिड राऊंडमध्ये 100 चा परिपूर्ण स्कोअर मिळवत सुवर्णपदक जिंकले.
भारतासाठी पदक विजेते
सुवर्णपदके : सम्राट राणा (10 मीटर एअर पिस्तूल), रविंदर सिंग (50 मीटर स्टँडर्ड पिस्तूल आणि 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक).
रौप्यपदके : ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर (50 मीटर रायफल 3 पोझिशन्स पुरुष), अनिश भानवाला (25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल), गुरप्रीत सिंग (25 मीटर सेंटर फायर पिस्तूल), ईशा सिंग आणि सम्राट राणा (10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक, 10 मीटर महिला एअर पिस्तूल सांघिक आणि 50 मीटर पुरुष स्टँडर्ड पिस्तूल सांघिक).
कांस्यपदके : ईशा (25 मीटर स्पोर्टस् पिस्तूल), इलावेनिल वलारिवन (10 मीटर एअर रायफल), वरुण तोमर (10 मीटर एअर पिस्तूल आणि 10 मीटर महिला एअर रायफल सांघिक).