Commonwealth Games 2026 | गुलवीर सिंगला ऐतिहासिक कांस्‍य; १० हजार पाठोपाठ ५ हजार मीटर्स इव्‍हेंटमध्‍येही यश 
स्पोर्ट्स

Commonwealth Games 2026 | गुलवीर सिंगला ऐतिहासिक कांस्‍य; १० हजार पाठोपाठ ५ हजार मीटर्स इव्‍हेंटमध्‍येही यश

एकाच राष्ट्रकुल स्पर्धेत दोन पदके

पुढारी वृत्तसेवा

ग्लास्गो; वृत्तसंस्‍था : भारताच्या २७ वर्षीय गुलवीर सिंगने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नवा इतिहास घडवला. पुरुष गटातील ५ हजार मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकून, एकाच राष्ट्रकुल स्पर्धेत दोन पदके पटकावणारा तो भारताचा पहिला ट्रॅक आणि फील्ड अ‍ॅथलीट ठरला आहे. या कामगिरीसह राष्ट्रकुल इतिहासात ५ हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.

अटीतटीच्या लढतीत कांस्य निश्चित

याआधी १० हजार मीटर शर्यतीत ऐतिहासिक रौप्यपदक पटकावणाऱ्या गुलवीरने, ५ हजार मीटर शर्यतीत १३ मिनिटे २४.९५ सेकंदांची वेळ नोंदवत कांस्यपदकावर नाव कोरले. केनियाच्या मॅथ्यू किपचुंबा किपसांगने १३:२३.६१ वेळेसह सुवर्ण, तर ऑस्ट्रेलियाच्या काय रॉबिन्सनने १३:२४.७० वेळेसह रौप्यपदक जिंकले. शेवटच्या १० मीटरमध्ये केनियाच्या कॉर्नेलियस केम्बॉईने गुलवीरला मागे टाकण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, गुलवीरने कमालीचा वेग वाढवत अवघ्या ०.०४ सेकंदांच्या फरकाने (केम्बॉई - १३:२४.९९) कांस्यपदक खेचून आणले.

दमदार रणनीती

संपूर्ण शर्यतीत गुलवीरने आघाडीच्या धावपटूंसोबत आपले स्थान टिकवून ठेवले. १००० मीटर टप्प्यावर तो मॅथ्यू किपचुंबा, रॉबिन्सन आणि मोहम्मद अहमद यांच्यासोबत आघाडीच्या फळीत होता. २००० आणि ३००० मीटर पार करतानाही त्याने अव्वल पाचमध्ये स्थान राखले. २४०० मीटरच्या टप्प्याला तो सातव्या क्रमांकावर घसरला होता, मात्र, त्याने त्वरित पुनरागमन करत अंतिम फेरीसाठी मजबूत पकड मिळवली.

शेवटच्‍या क्षणातील तो थरार.... अवघ्‍या ०.०४ सेकंदाने जिंकले कांस्‍य!

केनियाच्या कॉर्नेलियस केम्बॉईने शेवटच्या १० मीटरमध्ये गुलवीरला मागे टाकण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. दोन्ही धावपटूंमध्ये सेकंदाच्या शतांशासाठी जीवघेणी चुरस सुरू होती. या, ऐन मोक्याच्या क्षणी गुलवीरने कमालीचा वेग वाढवत केनियन आव्हान मोडून काढले. गुलवीरने १३ मिनिटे २४.९५ सेकंदात अंतर पार केले, तर केम्बॉई १३:२४.९९ सेकंदांसह अगदी किंचीत मागे राहिला. डोळ्यांचे पाते लवते ना लवते तोच, म्हणजेच अवघ्या ०.०४ सेकंदांच्या सूक्ष्म फरकाने गुलवीरने ऐतिहासिक कांस्यपदक खेचून आणले!

दोन पदके जिंकल्याचा आनंद आहे, पण माझी भूक अजून संपलेली नाही; मला अजून बरीच पदके जिंकायची आहेत. आफ्रिकन धावपटूंना हरवणे भारतीयांना नक्कीच शक्य आहे. आपणही मनुष्‍य आहोत आणि तेही. जर आपण कठोर परिश्रम घेतले आणि सरकारचे असेच पाठबळ मिळाले, तर भारतीय खेळाडू अ‍ॅथलेटिक्समध्ये नक्कीच मोठी झेप घेऊ शकतात.
गुलवीर सिंग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT