कोलकाता : गुणतक्त्यात टॉपर असलेल्या गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 39 धावांनी हरवून प्लेऑफच्या दिशेने भक्कम पावले टाकली. आठ सामन्यांत गुजरातचा हा सहावा विजय असून, त्यांचे 12 गुण झाले आहेत. उरलेल्या 6 सामन्यांपैकी फक्त 2 सामने जिंकून ते प्लेऑफ गाठू शकतात. सातव्या क्रमांकावर असलेल्या केकेआरला या सामन्यात विजय अत्यंत आवश्यक होता. 8 सामन्यांतील त्यांचा हा पाचवा पराभव आहे.
कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना शुभमन गिल (90) आणि साई सुदर्शन (52) यांच्या शतकी सलामीच्या जोरावर 198 धावा केल्या. याचा पाठलाग करताना केकेआरकडून आयपीएलमध्ये यंदा पहिल्यांदाच संधी मिळालेला गुरबाज पहिल्याच षटकांत बाद झाला. त्याच्या जागी आलेल्या कर्णधार अजिंक्य रहाणेने सुनील नारायणच्या साथीने डाव सावरला. सुनील नारायणला (17) बाद करून राशीद खानने ही जोडी फोडली. वेंकटेश अय्यरनेही निराशा केली. 14 धावांवर तो साई किशोरचा शिकार बनला. रहाणेने 36 चेंडूंत अर्धशतक केल्यानंतर तोही बाद झाला. वॉशिंग्टन सुंदरला पुढे सरसावून मारताना तो यष्टिचित झाला. आंद्रे रसेलचा वाढत चाललेला झंझावात राशीदने 21 धावांवर रोखला. रमनदीप सिंह (1) आणि मोईन अली (0) यांना तीन चेंडूंत प्रसिद्ध कृष्णाने बाद केले. नवव्या क्रमांकावर आलेल्या अंगक्रिश रघुवंशीने निकराचा प्रयत्न करूनही संघ 159 धावांपर्यंत पोहोचला. रघुवंशी 27 धावांवर नाबाद राहिला. राशीद खान आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी दोन विकेटस् घेतल्या.
तत्पूर्वी, कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरातकडून कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी सलामीला फलंदाजी केली. त्यांनी सुरुवातीपासूनच साधारण 10 ची धावगती राहील याची काळजी घेतली होती. गिलने आधी 34 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर लगेचच साई सुदर्शननेही 33 चेंडूंत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. साई सुदर्शनचे हे या हंगामातील 5 वे अर्धशतक आहे. त्याने यंदा 400 धावांचा टप्पाही पार केला आहे. तसेच गिलचे हे यंदाच्या हंगामातील तिसरे अर्धशतक आहे. याशिवाय आयपीएल 2025 मध्येही भागीदारीमध्येही गिल आणि सुदर्शन यांनी 400 धावांचा टप्पा पार केला आहे.
सुदर्शन अर्धशतकानंतर 13 व्या षटकात बाद झाला. त्याला आंद्रे रसेलने रेहमनउल्ला गुरबाजच्या हातून झेलबाद केले. सुदर्शनने 36 चेंडूंत 6 चौकार आणि 1 षटकारासह 52 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतरही शुभमन गिल त्याच्या लयीत खेळत होता. त्याला जोस बटलरचीही साथ मिळाली. त्यांना बाद करण्याच्या काही संधी कोलकाताने झेल सुटल्याने गमावल्या. गिल आणि बटलर यांच्यातही 58 धावांची भागीदारी झाली.
गिल शतक करेल असेही वाटत होते; पण त्याला 18 व्या षटकात वैभव अरोराने बाद केले. त्याचा झेल रिंकू सिंगने घेतला. पुढच्याच षटकात राहुल तेवातियाही शून्यावरच हर्षित राणाविरुद्ध खेळताना रमणदीप सिंगकडे झेल देत बाद झाला. अखेर बटलर आणि शाहरुख यांनी संघाला 20 षटकात 3 बाद 198 धावांपर्यंत पोहचवले. दरम्यान, अखेरच्या काही षटकांमध्ये कोलकाताच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. बटलर 23 चेंडूत 8 चौकारांसह 41 धावांवर नाबाद राहिला, तर शाहरुख 5 चेंडूंत 11 धावांवर नाबाद राहिला.
गुजरात टायटन्स : 20 षटकांत 3 बाद 198 धावा. (शुभमन गिल 90, साई सुदर्शन 52. आंद्रे रसेल 1/13.)
कोलकाता नाईट रायडर्स : 20 षटकांत 8 बाद 159 धावा. (अजिंक्य रहाणे 50, अंगक्रिश रघुवंशी 27. राशीद खान 2/25)