Gujarat Titans bus fire
अहमदाबाद: आयपीएलच्या अंतिम सामन्यातील पराभवाचे दुःख ताजे असतानाच गुजरात टायटन्सच्या संघावर आणखी एक संकट ओढवले. रविवारी रात्री नरेंद्र मोदी स्टेडियमवरून हॉटेलकडे परतत असताना संघाच्या बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. सुदैवाने सर्व खेळाडूंना वेळीच सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे खेळाडूंना जवळपास एक तास रस्त्यातच अडकून राहावे लागले.
आयपीएल फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडून पाच विकेट्सनी पराभूत झाल्यानंतर गुजरात टायटन्सचा संघ बसने हॉटेलकडे निघाला होता. अहमदाबादमधील प्रवासादरम्यान बसमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि त्यातून आग लागली. परिस्थिती गंभीर होण्याआधीच सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. हा प्रकार गुजरात टायटन्ससाठी आधीच निराशाजनक ठरलेल्या दिवसावर आणखी एक आघात मानला जात आहे. फायनलमध्ये संघाला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती आणि त्यानंतर लगेचच हा अपघात घडला.
दरम्यान, गुजरात टायटन्सचा प्रवास गेल्या काही दिवसांपासून खडतर राहिला होता. 27 मे रोजी संघाने धर्मशालाहून मुल्लानपूरला प्रवास केला होता. त्यानंतर 29 मे रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध क्वालिफायर-2 सामना खेळला. मात्र खराब हवामानामुळे 30 मे रोजी अहमदाबादला परतण्यासाठी उशिर झाला. त्यामुळे संघ शनिवारी उशिरा संध्याकाळी आपल्या ठिकाणी पोहोचला.
फायनलमधील पराभवामागे खेळाडूंचा थकवा कारणीभूत होता का, असा प्रश्न सामन्यानंतर उपस्थित करण्यात आला. यावर गुजरात टायटन्सचे क्रिकेट संचालक विक्रम सोलंकी यांनी थकव्याचे कारण पुढे करण्यास नकार दिला. “फक्त आम्ही सलग सामने खेळलो आणि थकलो होतो, असे सांगून आरसीबीच्या विजयाचे श्रेय कमी करायचे नाही. तो आमचा दृष्टिकोन नाही,” असे सोलंकी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.