स्पोर्ट्स

विजय गुजरातचा, फायदा ‘आरसीबी’चा

दिनेश चोरगे

अहमदाबाद; वृत्तसंस्था :  प्ले-ऑफच्या जवळ पोहोचण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला पराभूत व्हावे लागल्याने प्ले-ऑफमध्ये स्थान निश्चित करण्याचे त्यांचे स्वप्न अजून काही वेळ लांबणार आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात तळातील गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जला 35 धावांनी हरवले. गुजरातचे सलामीवीर साई सुदर्शन (103) आणि शुभमन गिल या दोघांनीही शतके झळकावत 210 धावांची विक्रमी सलामी देत गुजरातला तळातून आठव्या क्रमांकावर आणले. चेन्नईचे अजून बाराच गुण असून, ते चौथ्या क्रमांकावर आहेत. गुजरातच्या या विजयामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी)चे स्पर्धेतील आव्हान टिकून राहिले आहे.

गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 231 धावा केल्या. याचा पाठलाग करताना चेन्नईच्या डावाची सुरुवात खराब झाली. अजिंक्य रहाणे (1), रचिन रवींद्र (1) आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड (0) हे तिघे आघाडीचे फलंदाज 3 षटकांत तंबूत परतले. 3 बाद 10 धावा अशी अवस्था झाली असताना डॅरिल मिशेल आणि मोईन अलीने डाव सावरत 109 धावांची भागीदारी रचली; पण अनुभवी मोहित शर्माने मिशेल (63), मोईन (56) आणि शिवम दुबे (21) यांना तंबूत पाठवून चेन्नईच्या शिडातील हवा काढून घेतली. महेंद्रसिंग धोनीच्या नाबाद 26 धावांच्या जोरावर चेन्नईची मजल 8 बाद 196 धावांपर्यत पोहोचली.

तत्पूर्वी, गुजरात टायटन्सच्या सलामीवीरांनी स्फोटक खेळी करताना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांना घाम फोडला. गुजरातचा कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन या जोडीने धावांचा पाऊस पाडला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमानांनी चांगली सुरुवात केली. साई आणि शुभमन यांनी सुरुवातीपासूनच स्फोटक खेळी करून 16 षटकांत 179 धावा कुटल्या.

साई सुदर्शन आणि शुभमन गिल या दोघांनीही शतकी खेळी करून आपल्या संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. गिल पाठोपाठ सुदर्शनने देखील शतकाला गवसणी घातली. विकेटसाठी तरसलेल्या चेन्नईला अखेर 18 व्या षटकात साई सुदर्शनच्या रूपात पहिला बळी मिळाला. त्याला तुषार देशपांडेने बाद केले. 7 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने सुदर्शनने अवघ्या 51 चेंडूंत 103 धावा कुटल्या, तर शुभमनने 50 चेंडूंत शतक पूर्ण केले. 'आयपीएल'च्या इतिहासातील 100 वे शतक म्हणून गिलच्या अप्रतिम खेळीची नोंद झाली आहे. गिलने 55 चेंडूंत 6 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 104 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

गुजरात टायटन्स : 20 षटकांत 3 बाद 231 धावा. (साई सुदर्शन 103, शुभमन गिल 104. तुषार देशपांडे 2/33.)
चेन्नई सुपर किंग्ज : 20 षटकांत 8 बाद 196 धावा. (डॅरिल मिशेल 63, मोईन अली 56. मोहित शर्मा 3/31.)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT