स्पोर्ट्स

GT vs LSG IPL 2026 : बटलर-गिलचा अर्धशतकी झंझावात, गुजरातचा लखनौवर सहज विजय

प्रसिद्ध कृष्णाचे 28 धावांत 4 बळी

रणजित गायकवाड

लखनौ : जोस बटलर-शुभमन गिल यांची झंझावाती अर्धशतके व प्रसिद्ध कृष्णाच्या (4/28) भेदक गोलंदाजीच्या बळावर येथील आयपीएल साखळी सामन्यात गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंटस्‌‍चा 7 गड्यानी धुव्वा उडवला. प्रारंभी, गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माऱ्यामुळे लखनौला 164 धावांत रोखल्यानंतर, सलामीवीर जोस बटलर आणि शुभमन गिल यांच्या फटकेबाजीमुळे गुजरातने 165 धावांचे लक्ष्य 18.4 षटकांतच सहज गाठले.

गुजरातच्या विजयाचे शिल्पकार त्यांचे गोलंदाज ठरले. प्रसिद्ध कृष्णाने आपल्या धारदार स्पेलमध्ये 28 धावा देत 4 बळी टिपले आणि लखनौच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याला मोहम्मद सिराज, कागिसो रबाडा आणि अशोक शर्मा यांनी मोलाची साथ दिली. लखनौच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. एडन मार्करामने सर्वाधिक 30 धावा केल्या, तर कर्णधार ऋषभ पंत 18 धावांवर माघारी परतला. निकोलस पूरन आणि अब्दुल समद यांना मात्र या लढतीतही सूर सापडला नाही.

गिल-बटलरची निर्णायक भागीदारी

विजयाचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात काहीशी खराब झाली, मात्र त्यानंतर शुभमन गिल (56) आणि जोस बटलर (60) या जोडीने 84 धावांची निर्णायक भागीदारी करून सामन्याचे चित्र पालटले. बटलरने आपल्या आक्रमक शैलीत चौकार-षटकारांची बरसात केली, तर गिलने संयमी खेळी करत डावाला आकार दिला. या दोघांच्या अर्धशतकांमुळे लखनौच्या गोलंदाजांचा प्रतिकार निष्प्रभ ठरला. या विजयासह गुजरात टायटन्सने गुणतालिकेत आपली स्थिती मजबूत केली असून, लखनौच्या अडचणींत वाढ झाली आहे.

संक्षिप्त धावफलक

लखनौ सुपर जायंटस्‌‍ : 20 षटकांत 8/164 (मार्कराम 30; प्रसिद्ध कृष्णा 4/28, अशोक शर्मा 2/32).

गुजरात टायटन्स: 18.5 षटकांत 3/165 (बटलर 60, गिल 56; प्रिन्स यादव 1/31).

गुजरातसाठी केवळ दुसरा विजय

आतापर्यंत 4 सामने खेळलेल्या गुजरात टायटन्ससाठी हा केवळ दुसरा विजय ठरला. या विजयासह गुजरातचा संघ पाचव्या स्थानी पोहोचला असला तरी विजयात सातत्य राखणे त्यांच्यासाठीही महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT