GT VS DC | चेन्नई तिसऱ्यांदा प्ले ऑफमध्येच गारद; गुजरात टायटन्सचा 89 धावांनी दणकेबाज विजय 
स्पोर्ट्स

GT VS DC | चेन्नई तिसऱ्यांदा प्ले ऑफमध्येच गारद; गुजरात टायटन्सचा 89 धावांनी दणकेबाज विजय

अरुण पाटील

अहमदाबाद; वृत्तसंस्था : शुभमन गिल (37 चेंडूंत 64 धावा) आणि साई सुदर्शन (53 चेंडूंत 84 धावा) यांनी विक्रमी सातव्यांदा शतकी भागीदारी साजरी केल्यानंतर याच बळावर गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा 89 धावांनी अक्षरश: धुव्वा उडवला. प्रारंभी, गुजरातने 4 बाद 229 धावांचा डोंगर रचल्यानंतर प्रत्युत्तरात चेन्नईचा संघ विजयाच्या आसपासही फिरकू शकला नाही. त्यांचा डाव 13.4 षटकांत सर्वबाद 140 धावांमध्येच संपुष्टात आला. यासह चेन्नईचा संघ यंदा सलग तिसर्‍यांदा प्ले ऑफ गाठण्यात अपयशी ठरला आहे.

फलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर शुभमन गिल आणि साई सुदर्शन या सलामीच्या जोडीने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत विक्रमी सातवी शतकी भागीदारी केली. डावाच्या उत्तरार्धात जोस बटलरने (27 चेंडूंत नाबाद 57 धावा) चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत संघाला भक्कम धावसंख्या उभारून दिली. प्ले ऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी चेन्नईसाठी हा सामना जिंकणे अनिवार्य होते. मात्र, पहिल्या 6 षटकांच्या पॉवर प्लेमध्येच अवघ्या 51 धावांवर 4 गडी गमावल्यामुळे चेन्नईच्या हातातून सामना निसटला.

शिवम दुबेने (17 चेंडूंत 47 धावा) षटकारांची आतषबाजी करत एकाकी झुंज दिली; परंतु चेन्नईचा संपूर्ण संघ 13.4 षटकांत 140 धावांवर गारद झाला. गुजरातच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या 6 षटकांत उत्कृष्ट कामगिरी करत सामन्यावर पकड मिळवली. मोहम्मद सिराजने तीन बळी घेत चेन्नईला बॅकफूटवर ढकलले. सिराजला योग्य साथ देत कागिसो रबाडाने मॅथ्यू शॉर्टला बाद केले. गुजरात टायटन्सने आता 14 सामन्यांत 9 विजय मिळवून एकूण 18 गुणांसह आपल्या साखळी फेरीची यशस्वी सांगता केली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे आधीच 18 गुण असून, आज (शुक्रवारी) होणार्‍या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने बेंगळुरूचा पराभव केल्यास त्यांचेही 18 गुण होऊ शकतात. प्ले ऑफमधील अव्वल दोन संघांना 31 मे रोजी अहमदाबाद येथे होणार्‍या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन संधी मिळतील.

आयपीएलमधील नवा विक्रम

शुभमन गिल-साई सुदर्शन या जोडीने आयपीएलच्या इतिहासात सातव्यांदा शतकी भागीदारी पूर्ण करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला. या कामगिरीसह त्यांनी वॉर्नर-धवन आणि हेड-अभिषेक शर्मा यांना मागे टाकले. या दोन्ही जोड्यांच्या नावावर आयपीएलमध्ये प्रत्येकी 6 शतकी भागीदारींची नोंद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT