Norway Chess : प्रज्ञानंदच्या आईची भविष्यवाणी कशी खरी ठरली? नॉर्वेमध्ये विजेतेपद जिंकल्यानंतर त्याने सांगितला किस्सा  file photo
स्पोर्ट्स

Norway Chess : प्रज्ञानंदच्या आईची भविष्यवाणी कशी खरी ठरली? नॉर्वेमध्ये विजेतेपद जिंकल्यानंतर त्याने सांगितला किस्सा

भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावून इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी नोंदवले आहे.

पुढारी वृत्तसेवा

grandmaster r praggnanandhaa reaction after historic first for india in norway chess talk about his mother

पुढारी ऑनलाईन : भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावून इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी नोंदवले आहे. हे विजेतेपद मिळवणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. मात्र, त्यांच्या आईच्या शब्दांनी त्याला प्रेरणा दिली आणि त्‍याने धडाक्यात पुनरागमन करत हा किताब जिंकला.

ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंदने इतिहास रचत अंतिम फेरीत जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमरचा पराभव करून प्रतिष्ठित नॉर्वे चेस स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू होण्याचा मान त्‍याने मिळवला. चेन्नईच्या या 20 वर्षीय बुद्धिबळपटूने अशी कामगिरी केली, जी 2013 मध्ये या स्पर्धेची सुरुवात झाल्यापासून भारतीय बुद्धिबळातील दिग्गज विश्वनाथन आनंद आणि विद्यमान विश्वविजेता डी. गुकेश यांनाही साध्य करता आली नव्हती.

प्रज्ञानानंद याने सांगितले की, स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यापूर्वी त्यांच्या आईने केलेले भाकीत खरे ठरले.

प्रज्ञानानंद कसा ठरला विजेता?

अंतिम दिवसाची सुरुवात प्रज्ञानंदने 15 गुणांसह तिसऱ्या स्थानावरून केली होती. निर्णायक क्षणी त्याने उत्कृष्ट खेळ दाखवत क्लासिकल सामन्यात विजय मिळवला.

या विजयामुळे त्याला महत्त्वाचे तीन गुण मिळाले..

एकूण 18 गुणांसह त्याने बुद्धिबळ विश्वातील सर्वात प्रतिष्ठित ट्रॉफींपैकी एक असलेले नॉर्वे चेस विजेतेपद पटकावले.

या मोहिमेतील सर्वात खास बाब म्हणजे त्याने सात वेळा नॉर्वे चेस विजेता ठरलेल्या आणि जगातील अव्वल क्रमांकाच्या मॅग्नस कार्लसन याला क्लासिकल प्रकारात तब्बल दोन वेळा पराभूत केले.

विजेतेपदानंतर प्रज्ञानंद म्हणाला,

"माझी आई मला म्हणाली होती, 'नवा महिना सुरू झाला आहे, तू चांगला खेळशील.' मी तिला उत्तर दिलं, 'ठीक आहे, आई नेहमीच अशा गोष्टी सांगत असते.' पण त्यानंतर मी सलग चार सामने जिंकले. मला वाटतं, आईला काहीतरी आधीच जाणवलं होतं."

दमदार पुनरागमन

काही दिवसांपूर्वीपर्यंत प्रज्ञानंद या स्पर्धेचा विजेता ठरेल, अशी कल्पनाही करणे कठीण होते.

सहा खेळाडूंच्या या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात त्याच्या खेळात सातत्य दिसून आले नव्हते. तिसऱ्या फेरीत त्याने मॅग्नस कार्लसन याला हरवले होते, तरीही सहा फेऱ्यांनंतर त्‍याच्या खात्यात केवळ सहा गुण होते आणि ते गुणतालिकेत तळाशी होते.

मात्र, सातव्या फेरीत अलीरेझा फिरूझा याच्याविरुद्धच्या सामन्यापूर्वी आई नागलक्ष्मी यांचा आलेला एक फोन कॉल जणू सर्वकाही बदलून गेला. त्यानंतर प्रज्ञानंदने सलग चार क्लासिकल सामने जिंकले. यात कार्लसनवरील दुसऱ्या विजयाचाही समावेश होता. अखेरीस त्‍याने व्हिन्सेंट कीमरचा पराभव करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

यशामागचे रहस्य

या दमदार पुनरागमनाचे कारण विचारले असता प्रज्ञानंद म्हणाला, "सगळं काही माझ्या बाजूने घडलं. खेळादरम्यान माझे नियंत्रण अधिक चांगले होते, हेही महत्त्वाचे होते. मी आधीपेक्षा थोडं वेगाने खेळण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक सामन्यात माझ्याकडे वेळेचा फायदा होता आणि मी दर्जेदार चाली करू शकलो."

तो पुढे म्हणाला,

"अंतिम काही चालींपूर्वीच मला कळलं होतं की मी जिंकणार आहे. मात्र, नाइट e6 ही चाल खेळल्यानंतर मी जास्त विचार न करण्याचा प्रयत्न केला. मी फक्त चाली खेळत राहिलो. कारण जिंकण्याच्या स्थितीत असताना चूक होण्याची शक्यता खूपच कमी असते. तरीही मी खूप तणावाखाली होतो. प्रतिस्पर्धी निघून गेल्यानंतरच मला खऱ्या अर्थाने दिलासा मिळाला."

विजय ठरला अविस्मरणीय

चेन्नईच्या या ग्रँडमास्टरसाठी हा विजय केवळ स्पर्धेतील यश नव्हता, तर निराशेच्या उंबरठ्यावरून केलेले एक विलक्षण पुनरागमनही होते.

प्रज्ञानंद म्हणाला,

"कोणतीही स्पर्धा जिंकल्यावर आनंद होतोच. पण जेव्हा मॅग्नस कार्लसनसारखा खेळाडू स्पर्धेत सहभागी असतो, तेव्हा हे विजेतेपद अधिकच खास ठरते. आणि ज्या पद्धतीने मला हा विजय मिळाला, त्यामुळे त्याचे महत्त्व आणखी वाढले आहे. मी खूप आनंदी आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT