पुढारी ऑनलाईन डेस्क : Glenn Maxwell Record : ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 19 चेंडूत 43 धावा केल्या. ज्यात 5 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. या काळात त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या आणि विश्वविक्रम रचला.
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल हा टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत 10,000 धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने 6505 चेंडूत 10 हजार धावा करत किरॉन पोलार्डचा विक्रम मोडला. सर्वात लहान फॉरमॅटमध्ये हा आकडा गाठणारा मॅक्सवेल हा 16 वा क्रिकेटपटू आहे.
वेस्ट इंडिजचा महान अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 6640 चेंडूत दहा हजार धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला होता.
'युनिव्हर्स बॉस' म्हणून प्रसिद्ध असलेल्या ख्रिस गेलने 6705 चेंडूंचा सामना केल्यानंतर 10 हजारांचा टप्पा गाठला. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा (14562) करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.
इंग्लंडचा ॲलेक्स हेल्स या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्याने 6774 चेंडूत दहा हजार धावा पूर्ण केल्या.
इंग्लंडचा कर्णधार आणि तडफदार फलंदाज जोस बटलर या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 6928 चेंडूंचा सामना करून 10 हजार पूर्ण केल्या.