ग्लास्गो; वृत्तसंस्था : ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मधील पदकविजेत्या खेळाडूंच्या गळ्यात जेव्हा पदके घातली जातील, तेव्हा दृष्टिहीन आणि दृष्टिबाधित खेळाडूंना एक अनोखा अनुभव मिळणार आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच पदकांवर ‘ब्रेल’ लिपी आणि स्पर्शाने ओळखता येणारे घटक समाविष्ट केले आहेत. समावेशकतेला प्रोत्साहन देण्यासाठी ग्लास्गो आयोजकांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
यंदाच्या स्पर्धेत ६ पॅरा-स्पोर्टस्मध्ये विक्रमी ४७ सुवर्णपदकांचा समावेश आहे, जो राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठा पॅरा-स्पोर्टस् कार्यक्रम आहे. एकूण १० क्रीडा प्रकार आणि ६ पॅरा-स्पोर्टस् मिळून २१५ सुवर्णपदकांसाठी ही स्पर्धा रंगणार आहे.
अनोखा आकार : नेहमीच्या गोल आकाराऐवजी या पदकाला ‘रुलॉ त्रिकोण’ आकार देण्यात आला आहे, जो ग्लास्गो शहराच्या राजचिन्हावरून प्रेरित आहे.
स्कॉटलंडच्या संस्कृतीची झलक : पदकाच्या पृष्ठभागावरील डिझाईन ग्लास्गोचे प्रसिद्ध लँडमार्क ‘फिनिएस्टन क्रेन’ आणि स्कॉटलंडचे राष्ट्रीय प्रतीक मानल्या जाणाऱ्या ‘टार्टन’ कापडाच्या नक्षीवरून घेण्यात आले आहे.
तीन स्तर : पदकावर तीन वेगवेगळे स्तर दिले आहेत, जे खेळाडूंच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या क्षणाचे म्हणजेच ‘विजेत्यांच्या मंचाचे’ (पोंडियम) प्रतिनिधित्व करतात.