स्पोर्ट्स

Kohli vs Gambhir : का रे दुरावा.. का रे अबोला! गंभीर-कोहलीमधील वादाचे नाट्य संपता संपेना

रणजित गायकवाड

बर्मिंगहॅम : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी एजबेस्टन येथे झालेल्या भारतीय संघाच्या सराव सत्रादरम्यान एक धक्कादायक चित्र पाहायला मिळाले. यामुळे स्टार फलंदाज विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यातील संबंधांबाबत क्रीडा जगतात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. संपूर्ण नेट सत्रादरम्यान या दोघांमध्ये कोणताही संवाद झाला नसल्याचे समोर आले आहे. त्यातच, कर्णधार शुभमन गिलने आपण कोहलीसोबत २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीबाबत आणि सांघिक रचनेबाबत सविस्तर चर्चा केल्याचा खुलासा केल्याने, मुख्य प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापनाच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाने एजबेस्टनच्या मैदानावर जोरदार सराव केला. दुखापतीतून सावरून भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या विराट कोहलीवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. मात्र, सरावापेक्षाही नेट सत्रात विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यात अजिबात अबोला असल्याची बाब अधिक चर्चेत राहिली.

मिळालेल्या माहितीनुसार, गौतम गंभीर सराव सत्रादरम्यान रोहित शर्मा, शुभमन गिल आणि के. एल. राहुल यांच्यासह अनेक वरिष्ठ खेळाडूंशी चर्चा करताना दिसले. दुसरीकडे, विराट कोहली मात्र दीर्घकाळ एकटाच फलंदाजीचा सराव करण्यात मग्न होता. नेट सत्र संपल्यानंतर फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक हे आधी कोहलीशी स्वतंत्रपणे बोलले आणि त्यानंतर त्यांनी गंभीर यांच्याशी चर्चा केली. परंतु, संपूर्ण सत्रात कोहली आणि गंभीर यांच्यात थेट संवाद झाल्याचे कुठेही पाहायला मिळाले नाही. त्यामुळे या दोघांमधील शीतयुद्धाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे.

दुखापतीनंतर कोहलीचे संघात पुनरागमन

आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) कडून खेळताना विराट कोहलीच्या पायाचे स्नायू दुखावले होते. या दुखापतीमुळे त्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेला मुकावे लागले होते. आता त्याच्या पुनरागमनामुळे भारतीय फलंदाजीला मोठी मजबुती मिळण्याची अपेक्षा आहे. भारताला नुकत्याच झालेल्या आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत सलग पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर, फॉर्म आणि आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी ही एकदिवसीय मालिका भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

कर्णधार गिलचा मोठा खुलासा

पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार शुभमन गिलने सांगितले की, त्याची विराट कोहलीसोबत २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या रणनीतीबाबत प्रदीर्घ चर्चा झाली. दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्ट्या आणि तेथील परिस्थिती लक्षात घेता भारतीय संघाची रचना कशी असावी, भविष्यासाठी कोणत्या खेळाडूंना तयार करणे गरजेचे आहे आणि कोणत्या गोलंदाजांवर, अष्टपैलू खेळाडूंवर तसेच फिरकीपटूंवर संघाने लक्ष केंद्रित केले पाहिजे, यावर दोघांनी सखोल विचारविनिमय केला.

पत्रकार परिषदेत गिल म्हणाला, "आम्ही प्रामुख्याने टीम कॉम्बिनेशनवर (सांघिक रचना) चर्चा करत होतो. दक्षिण आफ्रिकेत आपल्यासाठी कोणती रचना सर्वात फायदेशीर ठरेल? असे कोणते खेळाडू आहेत जे सध्या संघात नाहीत, परंतु भविष्यात महत्त्वाचे योगदान देऊ शकतात? तसेच कोणत्या गोलंदाजांवर आणि अष्टपैलू खेळाडूंवर आपण विशेष लक्ष दिले पाहिजे? आमची चर्चा याच मुद्द्यांभोवती फिरत होती."

मुख्य प्रशिक्षक गंभीर यांच्यावर वाढता दबाव

गौतम गंभीर यांनी मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळल्यापासून भारतीय संघाच्या कामगिरी आलेख घसरल्यामुळे त्यांच्यावर सातत्याने टीका होत आहे. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पराभवानंतर संघ व्यवस्थापनाच्या रणनीतीवर क्रीडा तज्ज्ञांनी बोट ठेवले आहे. याशिवाय, संजू सॅमसन आणि वैभव सूर्यवंशी यांच्यासारख्या युवा खेळाडूंचा योग्य वापर न केल्यामुळे गंभीर यांच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही माजी क्रिकेटपटूंनी तर सध्याचे संघ व्यवस्थापन 'भ्रमात असलेले' आणि 'अव्यावसायिक' असल्याचा घणाघाती आरोपही केला आहे.

या सर्व घडामोडींमुळे इंग्लंडविरुद्धची ही एकदिवसीय मालिका केवळ भारतीय संघासाठीच नव्हे, तर प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या प्रतिष्ठेसाठीही अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. २०२७ च्या विश्वचषकाची पायाभरणी करण्याच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची असणार आहे. अशा स्थितीत रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांसारख्या दिग्गज खेळाडूंचे संघात पुनरागमन झाल्यानंतरही जर भारतीय संघ अपेक्षेनुसार कामगिरी करू शकला नाही, तर मुख्य प्रशिक्षक गंभीर आणि संघ व्यवस्थापनावरील अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT