Gautam Gambhir BCCI Reaction:
दक्षिण अफ्रिकेनं भारताला २-० असा व्हाईट वॉश दिल्यानंतर भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला पदावरून हटवण्यात येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. या मालिकेतील प्लेइंग ११, खेळपट्टी यावरून कोच गंभीरवर मोठी टीका झाली. गंभीर कोच झाल्यापासून टीम इंडियाची कसोटीतील कामगिरी दिवसेंदिवस खालावत आहे. गौतम गंभीरचं खराब ट्रॅक रेकॉर्ड पाहून त्याला कोचपदावरून काढून टाकणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताला मायदेशात गेल्या तीन कसोटी मालिकेतील दोन कसोटी मालिकेत व्हाईट वॉश मिळाला आहे. दक्षिण अफ्रिकेपूर्वी न्यूझीलंडने भारताला ३-० असा व्हाईट वॉश दिला होता. दरम्यान, गौतम गंभीरबाबत बीसीसीआयचा काय पवित्रा आहे याबाबत बीसीसीआयमधील सूत्रांनी माहिती दिली आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार गौतम गंभीर हे सध्या तरी तीनही फॉरमॅटचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहतील. त्यांच्या भविष्याबाबत बीसीसीआयनं अजून कोणता निर्णय घेतलेला नाही.'
बीसीसीआयने गौतम गंभीरसोबत तीन वर्षाचा करार केला आहे. बीसीसीआयने टीम इंडियाचे हेड कोच म्हणून गौतम गंभीरचा कार्यकाळ हा २०२७ च्या वर्ल्डकपपर्यंत असणार आहे असं सांगितलं होतं.
गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी चांगली नसली तरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप हे दोन चषक जिंकले आहेत.
टी२० क्रिकेटमध्ये देखील भारतीय संघाची कामगिरी समाधानकारक आहे. या फॉरमॅटमध्ये भारतीय संघ धाडसी क्रिकेट खेळतो. आता गौतम गंभीरचे पुढेच ध्येय हे भारतात होणारा टी २० वर्ल्डकप जिंकणे हे असणार आहे. जर या स्पर्धेत गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया चांगली कामगिरी करू शकली नाही तर त्याच्या प्रशिक्षक पदाच्या कार्यकाळाचा पुन्हा विचार केला जाण्याची शक्यता आहे. मात्र सध्या तरी गंभीर २०२७ पर्यंत टीम इंडियाचा कोच कायम राहील अशी स्थिती आहे.