Gautam Gambhir Head Coach Story Pudhari
स्पोर्ट्स

Gautam Gambhir: गौतम गंभीरला हेड कोचची ऑफर कोणी दिली होती? वर्ल्ड कपनंतर केला मोठा खुलासा

Gautam Gambhir Head Coach: टी-२० वर्ल्ड कप २०२६ जिंकल्यानंतर गौतम गंभीरने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदामागील रंजक कहाणी सांगितली. आयपीएल २०२४ दरम्यान जय शाह यांनी फोन करून थेट कोच होण्याची ऑफर दिली होती.

Rahul Shelke

Gautam Gambhir Head Coach Story: भारतीय क्रिकेट संघाने २०२६ चा टी-२० विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला. या ऐतिहासिक विजयामागे खेळाडूंसोबतच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचेही मोठे योगदान आहे. या यशामुळे गंभीर हा दोन आयसीसी ट्रॉफी जिंकणारा पहिला भारतीय मुख्य प्रशिक्षक ठरला आहे.

मात्र या यशामागे संघर्षाचा प्रवास असल्याचे गंभीरने एका मुलाखतीत सांगितले. त्याच्या मते, प्रशिक्षकपदाच्या सुरुवातीच्या काळात टीम इंडियाला काही कठीण पराभवांचा सामना करावा लागला होता. विशेषतः घरच्या मैदानावर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टेस्ट मालिकांतील पराभवामुळे त्याच्यावर टीका झाली होती. त्या काळात अनेक प्रश्न उपस्थित झाले, आरोप झाले आणि कठोर टीकेलाही सामोरे जावे लागले.

गंभीरने सांगितले की, त्या कठीण काळात त्याची विचारपूस करणारे फारसे कोणी नव्हते. मात्र एक व्यक्ती सतत त्याच्याशी संपर्कात होती आणि धीर देत होती. ती व्यक्ती म्हणजे आयसीसीचे अध्यक्ष जय शाह.

गंभीरच्या म्हणण्यानुसार, मुंबईत न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर तो विमानतळावर असताना जय शाह यांनी त्याला फोन करून धीर दिला आणि आत्मविश्वास कायम ठेवण्याचा सल्ला दिला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव झाल्यानंतरही त्यांनी फोन करून प्रोत्साहन दिले होते. गंभीर म्हणाला की, त्या कठीण काळात मिळालेला हा आधार तो कधीही विसरणार नाही.

गंभीरने मुलाखतीत आणखी एक किस्सा सांगितला. त्याने सांगितले की, २०२४ च्या आयपीएलदरम्यान मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याच्या वेळी जय शाह यांनी फोन केला होता. त्या फोनमध्ये जय शाह यांनी थेट ऑफर दिली. “मी तुला एक ऑफर देत आहे आणि तू ती नाकारू शकत नाहीस. तुला टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक व्हावे लागेल,” असे जय शाह यांनी सांगितल्याचे गंभीरने सांगितले.

ही ऑफर ऐकून गंभीर स्वतःही थोडा आश्चर्यचकित झाला होता, कारण त्या वेळी त्याने मुख्य प्रशिक्षक होण्याचा विचारही केला नव्हता. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्याची संधी मिळणे ही त्याच्यासाठी मोठा सन्मान असल्याचे त्याने सांगितले. त्याने कबूल केले की, त्याच्याकडे त्या वेळी प्रशिक्षक म्हणून फारसा अनुभव नव्हता, पण तरीही त्याच्यावर विश्वास दाखवण्यात आला.

या विश्वासाचेच फळ म्हणून गंभीरने संघात काही महत्त्वाचे बदल केले. खेळाडूंच्या निवडीत आणि रणनीतीत त्याने नवे प्रयोग केले आणि संघाला एक वेगळी दिशा दिली. त्याचेच परिणाम म्हणून टीम इंडियाने टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले.

गंभीरने या यशाचे श्रेय खेळाडूंना, संघ व्यवस्थापनाला आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या जय शाह यांना दिले. आज टीम इंडियाने मिळवलेले यश हे त्या विश्वासाचे आणि सातत्यपूर्ण मेहनतीचे फळ असल्याचे त्याने नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT