gautam gambhir team india new head coach.
भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे. File Photo
स्पोर्ट्स

Gautam Gambhir टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक, BCCI ची घोषणा

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Gautam Gambhir Head Coach : भारतीय संघाचे माजी सलामीवीर गौतम गंभीर यांना टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मंगळवारी (दि. 9) याबाबत घोषणा केली. आयसीसी टी-20 वर्ल्ड कपनंतर राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला. तेव्हापासून हे पद रिक्त होते. बीसीसीआयच्या त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीने टी-20 विश्वचषकादरम्यानच गौतम गंभीर आणि डब्ल्यूव्ही रमन यांची मुलाखत घेतली होती. चर्चेअंती गंभीर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

मंगळवारी गंभीरच्या नावाची घोषणा करताना जय शाह यांनी ट्विट केले. ते म्हणाले की, ‘भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचे स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. ते भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी आदर्श व्यक्ती आहेत. त्यांच्या या नव्या प्रवासाला बीसीसीआयचा पूर्ण पाठिंबा आहे’. गंभीर हे तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे प्रशिक्षक असतील. त्यांचा कार्यकाळ साडेतीन वर्षांचा असेल.

जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या पांढऱ्या चेंडूच्या मालिकेने गंभीर यांचा कार्यकाळ सुरू होईल. यानंतर टीम इंडिया बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात दोन कसोटी मालिका खेळणार आहे. वर्षाअखेरीस भारताला बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौराही करायचा आहे. कांगारू भूमीवर पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यानंतर 2025 मध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी, तसेच वर्षाच्या मध्यात इंग्लंडच्या दौ-याचा समावेश आहे. 2026 मध्ये भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे टी-20 विश्वचषकाचे आयोजन करणर आहेत. तर 2027 मध्ये एकदिवसीय विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत खेळवले जाणार आहे. गंभीर यांच्या कोचिंग अंतर्गत भारताचे दोन दिग्गज विराट कोहली (वय 35) आणि सध्याचा कर्णधार रोहित शर्मा (37) हे कशी कामगिरी करतील याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

गंभीर आयपीएलमध्ये एक उत्कृष्ट रणनीतीकार म्हणून उदयास आले. त्यांच्या नेतृत्वाखाली केकेआरला दोनदा चॅम्पियन बनली. तसेच, त्यांच्या मार्गदर्शनाखाली लखनौने सलग दोन हंगामात (2022, 2023) प्लेऑफमध्ये प्रवेश केला. 2024 मध्ये, कोलकाता नाईट रायडर्सचे मार्गदर्शक असताना त्यांनी संघाला चॅम्पियन बनवले.

गंभीर यांचे व्यवस्थापन कौशल्य उत्कृष्ट आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षपदाचा त्यांचा कार्यकाळ जुलै 2024 ते 31 डिसेंबर 2027 असा असेल. म्हणजेच त्याच्या कोचिंगमध्ये टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2025, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2025 आणि 2027, टी-20 वर्ल्ड कप 2026 आणि एकदिवसीय वर्ल्ड कप 2027 खेळेल. म्हणजेच गंभीर यांच्यापुढे तीन मर्यादित षटकांचे विश्वचषक आणि दोन आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप जिंकण्याचे आव्हान असेल.

एक खेळाडू म्हणून, 2007 मध्ये भारताच्या टी-20 विश्वचषक विजयात आणि 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक विजयाचा गंभीर महत्त्वाचा भाग होते. त्यांनी 2011 ते 2017 या सात आयपीएल हंगामांसाठी KKR चे नेतृत्व केले आणि ते पाच वेळा प्लेऑफसाठी पात्र ठरले. कर्णधार म्हणून त्यांनी 2012 आणि 2014 मध्ये दोन विजेतेपद पटकावले.

SCROLL FOR NEXT