पॅरिस; वृत्तसंस्था : अमेरिकेची युवा टेनिस तारका, जागतिक क्रमवारीतील द्वितीय मानांकित कोको गॉफने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात बलाढ्य आर्यना सबालेंकाला पराभूत करत आपले पहिले फ्रेंच ओपन आणि एकूण दुसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले. तब्बल 2 तास 38 मिनिटे चाललेल्या या संघर्षपूर्ण सामन्यात गॉफने सबालेंकावर 6-7, 6-2, 6-4 असा विजय मिळवला. या विजयासह तिने रोलँड गॅरोसच्या लाल मातीवर ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
विशेष म्हणजे, तब्बल सात वर्षांनी जागतिक क्रमवारीतील पहिल्या आणि दुसर्या क्रमांकाच्या खेळाडूंमध्ये हा अंतिम सामना रंगला होता. रोलँड गॅरोसच्या क्ले कोर्टवर झालेल्या या रोमहर्षक लढतीत कोकोने पहिला सेट गमावल्यानंतरही जबरदस्त पुनरागमन करत विजयश्री खेचून आणली. या सामन्यापूर्वी दोन्ही खेळाडूंनी एकमेकींबद्दल आदर व्यक्त केला होता. कोकोने सबालेंकाबद्दल म्हटले होते की, ती एक अप्रतिम खेळाडू आहे. तिचे शॉटस् खूप ताकदवान असतात आणि ती आक्रमक खेळते. मला तिच्याविरुद्ध सर्वोत्तम तयारी करावी लागेल. दुसरीकडे, अमेरिकन ओपनमध्ये कोकोकडून पराभूत झालेल्या 27 वर्षीय सबालेंकानेही म्हटले होते की, या विजेतेपदासाठी मला खूप मेहनत करावी लागेल, विशेषतः कोकोविरुद्ध. मी त्यासाठी तयार आहे आणि सर्वस्व पणाला लावेन.
गेल्या दोन वर्षांत दोन ऑस्ट्रेलियन ओपन आणि एक अमेरिकन ओपन एकेरी विजेतेपदे जिंकणार्या सबालेंकाचा क्ले कोर्टवरील फॉर्म प्रभावी होता, मात्र गॉफने तिच्यावर मात करत टेनिस विश्वात आपली नवी ओळख निर्माण केली आहे. या विजयामुळे कोको गॉफच्या कारकिर्दीला नवी दिशा मिळाली असून, भविष्यात ती अनेक विक्रम प्रस्थापित करण्याची क्षमता तिच्यात असल्याचे तिने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.